Mon, Jun 24, 2019 21:15होमपेज › Kolhapur › पानसरे हत्येप्रकरणी डॉ. तावडेच मास्टरमाईंड

पानसरे हत्येप्रकरणी डॉ. तावडेच मास्टरमाईंड

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या कटात सनातन साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच ‘मास्टरमाईंड’ असल्याचे पुरावे एसआयटी चौकशीतून पुढे आले आहेत. असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी शनिवारी न्यायालयात केला. सारंग आकोळकर, विनय पवारच्या मदतीने पुरोगामी नेत्यांच्या हत्येसाठी षड्यंत्र रचल्याचे उघड झाल्याने डॉ. तावडेचा  जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशीही मागणी केली. कॉ. पानसरे हत्येतील आरोपी डॉ. तावडे याने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश (2) एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

डॉ. तावडेचे वकील समीर पटवर्धन, अ‍ॅड वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा उर्वरित युक्तिवाद पूर्ण झाला. विशेष सरकारी वकील निंबाळकर यांनी डॉ. तावडे याच्या जामिनाला हरकत घेतली.  दोन्ही बाजूकडून वकिलांच्या अडीच तासांच्या युक्तिवादानंतर न्या. बिले यांनी  येत्या 30 जानेवारीला निर्णय होईल, असे जाहीर केले.    अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, कॉ. पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने केलेल्या चौकशीत तावडेविरुद्ध  ठोस पुरावे हाती लागले आहेत. तावडे  मडगाव बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी आकोळकर, पवारच्या संपर्कात असल्याचे पुरावेही उपलब्ध  आहेत. 

 हत्येसाठी तावडे याने मडगाव बॉम्बस्फोट खटल्यातील दोन्ही फरारी आरोपींची कोल्हापूर येथील एका साक्षीदाराशी भेट घडवून दिली होती. घातक शस्त्रासह काडतुसासाठी तावडेने तगादा लावला होता. अशीही माहिती साक्षीदाराच्या जबाबातून उघड झाली आहे. कॉ. पानसरे यांच्या दैनंदिन हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी आरोपीने आकोळकर, पवारवर जबाबदारी सोपवल्याचे उघड झाल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.   डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने डॉ. तावडेवर यापूर्वीच अटकेची कारवाई केली आहे. या खटल्यात त्याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. कॉ. पानसरे हत्येतही महत्त्वाचा सहभाग असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी  मागणी केली. 

  2099-2004 या काळात तावडेचे कोल्हापुरात वास्तव्य होते. त्यामुळे कॉ. पानसरे यांच्या चळवळीची माहिती होती. पानसरेंची काही व्याख्यानेही उधळून लावण्याचा तावडेने प्रयत्न केला होता. शिवाय पानसरेंविरुद्ध मोर्चाही काढण्याचा प्रयत्न झाला होता. पानसरे यांच्या हत्येपूर्वीही काहीकाळ तावडेचे कोल्हापुरातील वास्तव्य संशयास्पद होते. असेही विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 

वकिलांत खडाजंगी 

डॉ. तावडेच्या जामीन अर्जावर अ‍ॅड. समीर पटवर्धन यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी आक्षेप नोंदवित युक्तिवाद सुरू केला. डॉ.दाभोळकर,कॉ.पानसरे यांच्यासह डॉ.कलबुर्गी हत्येचा संदर्भ देत असताना अ‍ॅड. पटवर्धन यांनी त्यास  हरकत घेतली. मध्येच बोलण्याचा प्रयत्न करताच अ‍ॅड. निंबाळकर संतप्त झाले. पटवर्धन यांच्यावर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. न्या.बिले यांच्यासमोर सहा-सात मिनिटे खंडाजंगी सुरू होती. न्या.बिले यांनी हस्तक्षेप करीत वाद थांबला नाही तर, सुनावणी तहकूब ठेवण्याचा इशारा दिला. त्यानंतर दोन्ही बाजूकडील वकिलांनी नमते घेतले. या घटनेची न्यायालय आवारात चर्चा रंगली होती.