Wed, Mar 27, 2019 06:43होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यास प्राधान्य :आमदार महाडिक

पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यास प्राधान्य :आमदार महाडिक

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 1:08AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः प्रतिनिधी 

देशातील पहिल्या सात प्रदूषित नद्यांमध्ये कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा समावेश आहे; परंतु शहरात अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहेत. नाल्यावरही सांडपाणी प्रक्रिया केंद्रे बांधली जाणार आहेत. त्यातून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी बुधवारी केले. शहरातील 59 कोटींच्या भुयारी गटर योजनेचे भूमिपूजन आ. महाडिक व महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते नाळे कॉलनी येथे झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर सुनील पाटील प्रमुख उपस्थित होते. आ. महाडिक यांनी, उपनगरातील ड्रेनेजची समस्या आहे.

या योजनेमुळे ती निकाली निघेल. तसेच दुसर्‍या टप्प्यात अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईन बदलण्याच्या प्रकल्पाची मंजुरी घेणे व शहरातील इतर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच यापूर्वी शहरात सुरू झालेले कोणतेही प्रकल्प पूर्ण झाले नाहीत; मात्र ही योजना पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अमृत अभियानांतर्गत कोल्हापूर शहर मलनिस्सारण योजना व नाले अडविणे आणि वळविणे संबंधित कामासाठी 70 कोटी 77 लाखांच्या प्रकल्पास केंद्राची मंजुरी मिळाली आहे. योजनेअंतर्गत शहरातील दुधाळी नाला झोनमधील उर्वरित भूयारी पाईपलाईन, दुधाळी येथे आवश्यक क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र व अनुषंगिक कामे, जयंती नाला झोनसाठी आवश्यक क्षमतेचे मलनिस्सरण केंद्र व अनुषंगिक कामे यांचा समावेश आहे. याशिवाय शहर हद्दीतून वाहणारे व पंचगंगा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे एकूण 15 नाले आहेत. 

जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात भुयारी गटर योजनेची माहिती दिली. नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन विजय वणकुद्रे यांनी केले. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, गटनेता सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, संतोष गायकवाड, किरण नकाते आदींसह नगरसेविका व इतर उपस्थित होते.