Fri, Jul 19, 2019 07:31होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : घरफाळा वाढीला विरोध कायम

कोल्हापूर : घरफाळा वाढीला विरोध कायम

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहरातील घरफाळा वाढीबाबत ठेवण्यात आलेला ऑफिस प्रस्तावाविरोधात  सर्वसाधारण सभेत  नगरसेवकांनी संतप्‍त भावना व्यक्‍त केल्या. सुविधांची वानवा असताना, आहे त्या मिळकतींवरच वाढीव कराचा बोजा कशासाठी, अशा अनेक प्रश्‍नांनी प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. कोणत्याही निर्णयाविना सभेत केवळ चर्चाच झाली. महापौर सौ. स्वाती यवलुजे यांनी सभा तहकुबीची घोषणा केली. त्यामुळे तूर्तास घरफाळावाढ रखडली. 

महापलिकेने भाड्यावरील कर आकारणी रद्द करून मिळकतीप्रमाणे कर आकारणीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणीचे सूत्र स्वीकारले आहे.  यानुसार रहिवासी, व्यावसायिक मिळकतींना दर आकारणी केली जाते, तर भाडेतत्त्वावरील मिळकतींसाठी भाडे आकार आकारला जातो. या प्रकारच्या दुहेरी करपद्धतीमुळे भाडेतत्त्वावरील अनेक मिळकतींना 70 टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो. यातून भाडेतत्त्वारील मिळकतधारकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी रहिवास मिळकतधारकांना बोजा सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, या सभेत घरफाळा वाढ होणार की नामंजूर होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते. सुरुवातीलाच सत्यजित कदम यांनी महापालिकेने घरफाळा वाढीबाबत मांडलेल्या ऑफिस प्रस्तावावर नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, जो प्रस्ताव आहे तो सदस्यांना अगोदर का देण्यात आला नाही? प्रशासनाचा मनमानी कारभार कशासाठी? यापूर्वीही असे प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आले आहेत; पण महापलिकेच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाते. कोणालाही विश्‍वासात न घेता हा प्रस्ताव परस्पर मांडण्याची काय गरज आहे? नगरसेवकांना सर्व काही माहीत असते असे जनतेला वाटते आणि दरवाढीचे खापर आमच्या डोक्यावर फोडले जाते. जर प्रशासनाला अशाच पध्दतीने काम करायचे असेल तर आम्ही पदाचे राजीनामे देतो. प्रशासनाने आपल्या पध्दतीने महापालिका चालवावी. आम्ही काय करायचे बघतो.

शारंगधर देशमुख यांनीही प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. आम्हाला  जी दरवाढ करणार त्याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे हा प्रस्ताव आम्ही मंजूर करणार नाही, असे ते म्हणाले. अगोदरच सभागृहाची दिशाभूल करून गेल्यावेळी घरफाळा वाढीचा प्रस्ताव मंजूर केला गेला. यावेळी ही चूक होवू देणार नाही. उलट भाडेकरूंना जी 70 टक्के वाढ झाली आहे तीही कमी करावी अशी आमची मागणी आहे. त्यामुळे ऑफीसने या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची अपेक्षा करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अजित ठाणेकर यांनी महापालिकेकडून घरफाळा वसूली योग्य पध्दतीने होत नसल्याचे सांगितले. शहरातील अनेक मिळकतींना घरफाळा लागू करण्यात आलेला नाही. ज्या मिळकतींना घरफाळा लागू नाही अशांना घरफाळा लागू करावा यासाठी प्रशासानने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा मिळकतींचा सर्व्हे करण्यासाठी एका खासगी कंपनीला काम देण्यात आले. पण त्यांच्याकडूनही योग्य पध्दतीने काम झाले नसल्याचे सांगितले.  भुपाल शेटे यांनीही या कंपनीकडून करण्यात आलेला सर्व्हे बोगस असल्याचे सांगितले.  भाडे तत्वावरील घरफाळयात होणारी वाढ ध्यानात घेवून अनेकांनी घरे भाड्याने दिली आहेत ही माहिती लपवून ठेवली तर काहींनी  एकाच मिळकतींचे दोन भाग दाखविले. यातून महापालिकेचा तोटा झाला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. 

किरण नकाते, विजय सुर्यवंशी, किरण शिराळे आदींनी घरफाळा वाढीच्या ऑफीस प्रस्तावाला विरोध केला. अखेर अन्य विषयांवर चर्चा केल्यानंतर महापौर सौ. स्वाती यवलुजे यांनी सभा तहकूब केली.

पिरजादे हजर, चव्हाण गैरहजर

स्थायी समिती सभापती निवडीत भाजप आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांच्या घरावर मोर्चा काढून निषेध व्यक्‍त केला होता. त्यानंतर प्रथमच सर्वसाधारण सभा झाली. या सभेला पिरजादे  व चव्हाण उपस्थित राहणार का, याकडे लक्ष होते. आले तर ते कोठे बसणार याची उत्सुक्‍ता होती. पिरजादे या सभेला उपस्थित राहिले ते काँग्रेस आघाडीच्या बाजूला बसले तर अजिंक्य चव्हाण  सभेला गैरहजर होते.

आधी  बुडव्यांकडून घरफाळा वसुली करा

 प्रस्तावित घरफाळा वाढीला सभागृहातील सर्वच सदस्यांनी विरोध केला. आहे त्या मिळकतींवर करांचा बोजा न चढवता  जे घरफाळा बुडवतात त्यांच्याकडून  वसूल करा, अशी मागणी सदस्यांनी हातात फलक घेऊन केली. काही फलकांवर  घरफाळा लागू न केलेल्या मिळकतींचा शोध घ्या, असा मजकूर होता. तर शिवसेनेचे राहुल चव्हाण, नियाज खान, प्रतिज्ञा उत्तुरे यांनी हातात फलक घेऊन सभागृहात प्रवेश करत घरफाळा वाढीच्या प्रस्तावाला  विरोध केला.