Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Kolhapur › कांदा, गूळ दरात घसरण

कांदा, गूळ दरात घसरण

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 12:39AM

बुकमार्क करा
 कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याचे दर उतरलेले पहायला मिळाले. गुळाचा दर हंगामाच्या सुरुवातीच्या काळातील दराच्या तुलनेत उतरलेला आहे. मात्र, गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. समितीत कांद्याची आवकही वाढू लागली आहे. बाजार समितीत गेल्या दीड महिन्यापूर्वी गुळाचा प्रतिक्विंटलला सरासरी भाव 3 हजार 900 रुपयांच्या आसपास होता. मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून आवक मोठ्या प्रमाणात वाढू लागली. परिणामी गुळाचे दर कोसळण्यास सुरुवात झाली. गुळाचा प्रतिक्विंटलचा दर 3 हजार 600 रुपयांपर्यंत खाली आला आहे. यामुळे गूळ उत्पादकात नाराजीचे वातावरण आहे. मात्र, गत आठवड्याच्या तुलनेत हा भाव स्थिर आहे.

13 ते 19 डिसेंबर या कालावधीत 28 हजार 709क्विंटल गुळाची समितीत आवक  झाली. गत आठवड्यात 3 हजार 600 रुपये इतका  सरासरी दर होता. या आठवड्यात 26 डिसेंबरपर्यत 39 हजार 692 क्विंटल गुळाची आवक झाली. कमीत कमी 3 हजार रुपये व जास्तीत जास्त 4 हजार 700 रुपये भाव प्रतिक्विंटलला  मिळाला. सरासरी हा भाव 3 हजार 600 रुपये इतकाच राहिला कांदा विभागात काही दिवसांपूर्वी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली होती. सध्या नवीन कांद्याची आवक समितीत होत आहे. त्यामुळे गेले तीन आठवडे कांद्याची आवक वाढताना दिसून येत आहे.  गत आठवड्यात 30 हजार 498 क्विंटल इतकी आवक झाली. प्रतिक्विंटलला दर 1 हजार रुपये ते 5 हजार 300 रुपये असा राहिला. सरासरी दर 2 हजार 900 असा होता. या आठवड्यात आवक 930 क्विंटलने घटली व दरातही प्रतिक्विंटलला 330 रुपयांची घट झालेली आहे.