होमपेज › Kolhapur › पश्‍चिम महाराष्ट्रात आठ नवे राष्ट्रीय महामार्ग!

पश्‍चिम महाराष्ट्रात आठ नवे राष्ट्रीय महामार्ग!

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 1:13AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील कदम

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) पश्‍चिम महाराष्ट्रात 840 किलोमीटर लांबीचे आठ नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले आहेत. या महामार्गांचे काम अत्यंत गतीने करण्याच्या हेतूने त्याबाबतची अधिसूचना जारी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. या राष्ट्रीय महामार्गांमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन, तर सोलापूर जिल्ह्यातील एका महामार्गाचा समावेश आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेले राष्ट्रीय महामार्ग पुढीलप्रमाणे : कराड-पाटण-चिपळूण-गुहागर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई, एकूण लांबी 140 किलोमीटर), कराड-तासगाव-जत-विजापूर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 266, एकूण लांबी 185 किलोमीटर), रेडी जंक्शन-सावंतवाडी-आजरा-गडहिंग्लज-संकेश्‍वर (एकूण लांबी 96 किलोमीटर), वेंगुर्ला-मठ-आंबोली-चंदगड-बेळगाव (एकूण लांबी 110 किलोमीटर), तळेरे जंक्शन-गगनबावडा-कोल्हापूर (एकूण लांबी 99 किलोमीटर), सांगोला-जत (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी, एकूण लांबी 50 किलोमीटर), कराड-विटा-खानापूर-जरंडी-नागज (एकूण लांबी 105 किलोमीटर) आणि सांगली-पेठनाका (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166, एकूण लांबी 55 किलोमीटर). नव्याने मंजूर करण्यात आलेल्या यापैकी चार महामार्गांना अद्याप क्रमांक देण्यात आलेले नाहीत.

प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या महामार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण ठरणार आहे. कराड-चिपळूण, रेडी जंक्शन-संकेश्‍वर, वेंगुर्ला-बेळगाव आणि तळेरे जंक्शन-कोल्हापूर या चार महामार्गांमुळे कोकणपट्टा थेट महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकशी जोडला जाणार आहे. त्यामुळे कोकणच्या गतिमान विकासाला चालना मिळणार आहे. पेठ नाका-सांगली हा महामार्ग पुढे मिरजेला जाऊन नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाला मिळणार असल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून मराठवाडा, विदर्भाकडे जाणारी वाहतूक गतिमान होणार आहे. कराड-विजापूर आणि

कराड-नागज या दोन महामार्गांमुळे सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारशी आणि कर्नाटकशी जोडला जाणार आहे. सांगोला-जत महामार्गामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भाग पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे नव्याने मंजूर झालेल्या आठ महामार्गांमुळे या भागातील सर्वप्रकारच्या विकासाला जोरदार चालना मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकार्‍यांना या नवीन आठ महामार्गांच्या अनन्यसाधारण महत्त्वाची चांगलीच जाणीव झाली आहे. त्यामुळे या सर्व महामार्गांची अधिसूचना काढण्यात येऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आलेली आहे. हे सर्व महामार्ग पहिल्या टप्प्यात चारपदरी असणार आहेत. कालांतराने या महामार्गांवरील वाहतुकीचे प्रमाण विचारात घेऊन ते सहापदरी आणि आवश्यकता भासल्यास आठपदरी करण्यात येणार आहेत.