Sat, Jan 25, 2020 08:19होमपेज › Kolhapur › धर्माचरण, धर्मरक्षणातून हिंदूराष्ट्र होईल

धर्माचरण, धर्मरक्षणातून हिंदूराष्ट्र होईल

Published On: Dec 18 2017 2:33AM | Last Updated: Dec 18 2017 1:47AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

भारत हिंदूराष्ट्र बनावयाचा असेल तर निवडणुकीच्या माध्यमातून ते होणार नाही. धर्माचरण आणि धर्मरक्षण या माध्यमातून हिंदूराष्ट्र होऊ शकेल, असे प्रतिपादन हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केले. हिंदू जनजागृती समितीच्यावतीने येथील पेटाळा मैदानावर आयोजित  हिंदू धर्मजागृती सभेत ते बोलत होते. अ‍ॅड. पुनाळेकर म्हणाले, आमचा लढा देशाशी नाही, देशाच्या संविधानाशी नाही तर आमचा लढा सरकारशी आहे. सरकार सर्व बाबतीत फेल ठरत आहे. सरकार हिंदूची फसवणूक करत आहे. या विरोधात आमचा लढा आहे. शासन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीबाबत कायदा करू पाहत आहे; पण या कायद्याद्वारे शासन मंदिरांच्या  जमिनी भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव आखत आहे. त्यामुळे त्यांनी  देवस्थान समितीसाठी कायदा न करता देवस्थानची गेलेली जमीन परत मिळविण्याचा प्रयत्न करावा.

अ‍ॅड. समीर पटवर्धन म्हणाले, राज्यकर्ते, पोलिस यांनी सनातनची मुस्कटदाबी करण्याचे कितीही प्रयत्न केले तरीही हिंदू राष्ट्राची स्थापना त्यांना रोखता येणार नाही. जोपर्यंत हिंदू राष्ट्राची स्थापना होणार नाही, तोपर्यंत सनातचे साधक स्वस्थ बसणार नाहीत. सनातनच्या धर्मप्रसारक स्वाती खाड्ये म्हणाल्या, कोणी कितीही विरोध केला तरी 2023 पर्यंत हा देश हिंदूराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी हिंदूंनी जात-पात न पाहता एकत्र यावे.  शासन वारकरी भवनसाठी, हिंदूच्या सामाजिक अडचणी सोडविण्यासाठी पैसे नाही म्हणते, मात्र इतर धर्मीयांना पैसे देते. म्हणजे हिंदूंसाठी कायदे आणि इतर धर्मीयांना फायदे असा हा प्रकार  आहे. यापुढे हे चालू देणार नाही. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्रांचे रक्षण झाले पाहिजे.

गेल्या काही वर्षात 20 लाख हिंदूंनी धर्मांतर केले, ही परिस्थिती फार भयायह आहे. हिंदूंचे धर्मांतर, देवतांच्या मूर्तीचे भंजन, गो-हत्या, लव्ह जिहाद आदी माध्यमांद्वारे धर्मांधांच्या कारवाया वाढत आहेत, अशा शक्तींना वेळीच रोखण्याची गरज आहे. मनोज खाड्ये म्हणाले, गेल्या 70 वर्षांत देशातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, दारिद्य्र, शेतकर्‍यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. कारण या देशात भ्रष्ट आणि शोषक प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्याविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहेे. डॉ. भारत पाटणकर हे सनातनच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशनची भाषा करतात. त्यांनी विनासोवळे गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी कायदा मोडण्याची भाषा करू नये. अशी कृत्ये करण्याआधी त्यांनी त्यांची अतिरेकी स्वरूपाची आणि कोत्या मनाची वृत्ती बदलावी. आजपर्यंत जे पुरोगामी विचारवंत होऊन गेले ते संयमी आणि शांत होते. त्यांनी कायदा मोडण्याची भाषा केली नाही. त्यामुळे डॉ. पाटणकर हे संयमी आणि विचारवंत होऊ शकतात का? असा सवालही अ‍ॅड. पुनाळेकर यांनी उपस्थित केला. प्रारंभी समितीचे शिवानंद स्वामी यांनी शंखनाद केला. यानंतर प्रमुख पाहुणे अ‍ॅड. पुनाळेकर, अ‍ॅड. पटवर्धन, स्वाती खाड्ये आदींचा सत्कार करण्यात आला. संदीप निगुडकर, सचिन काजरेकर आणि विशाल जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. आभार किरण दुसे यांनी मानले.