Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Kolhapur › नगरोत्थानमधील रस्त्यांची कामे कधी होणार पूर्ण

नगरोत्थानमधील रस्त्यांची कामे कधी होणार पूर्ण

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 12:16AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः प्रतिनिधी 

आपटेनगर रिंगरोड येथे फुटपाथ नाही. रिंगरोडवरील पाईपलाईनचे काम झाले; पण रस्ता कधी पूर्ण होणार? अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने साई मंदिर ते फुलेवाडी नाका 5 कि.मी.चा रस्ता आहे. नगरोत्थानमधून 10 मी. डांबरी रस्ता व बाजूपट्टी काँक्रीटची आहे. त्या ठिकाणी 30 फुटांचा डी.पी. रोड असल्याने उर्वरित रस्ता केल्यानंतर फुटपाथसाठी वेगळा निधी धरून फुटपाथ करावा लागेल. रिंगरोडवरील जलवाहिनीच्या दोन गळती काढल्यावर नगरोत्थानची कामे पुढील आठवड्यात सुरू करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप नेजदार होते.  
स्पीडब्रेकर करण्यासाठी ट्रॅफिक, आरटीओची परवानगी लागते. अशी परवानगी घेतली होती का? नको तेथे स्पीडब्रेकर केले आहेत. जेथे गरज आहे त्या ठिकाणी केलेले नाहीत. शाहूपुरी ते उड्डाणपूल येथे पाच स्पीडब्रेकर केले आहेत. काही ठिकाणी नियमाप्रमाणे पट्टे न मारता चुन्याचे पट्टे मारलेत. जे स्पीडब्रेकर विनापरवाना केले आहेत त्यांचे बिल आदा करायचे नाही, अशा सूचना सदस्यांनी केल्या. प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या मागणीनुसार स्पीडब्रेकर केले आहेत, असे सांगण्यात आले. 

कोतवालनगर रिंगरोड येथील अपार्टमेंटमधील पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे चिखल, दलदल झाली आहे. डांसाचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूचा आजार फैलावला, तर त्याला कोण जबाबदार? नगररचना विभाग कशी परवानगी देते, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने तात्पुरता लेआऊट मंजूर आहे. पुढचे प्लॉटधारक इतर अपार्टमेंटचे पाणी पुढे जाऊ देत नाहीत. संबंधितांना नोटीस काढू; अन्यथा संबंधितांचा बांधकाम परवाना रद्द करण्याची कार्यवाही करू, असे स्पष्ट करण्यात आले. 

मुंबईमध्ये हॉटेलमध्ये आग लागून मनुष्यहानी झाली. कोल्हापुरात अशाप्रकारची हॉटेल्स सुरू आहेत का? त्याबाबत महापालिकेने काय कारवाई केली. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात लोक जमतात त्या ठिकाणी तपासणी करा, अशी सूचना सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने अग्निशमन विभागाने हॉटेलची पाहणी केली आहे. ज्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण आहे अशा सर्व संबंधित हॉटेल्स, कार्यालये व इतर ठिकाणच्या संबंधितांची बैठक आयोजित करू, असे स्पष्ट केले. पोलिस बंदोबस्त मिळताच अतिक्रमण कारवाई करू, असे सांगितले.