Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Kolhapur › नाबार्ड ने कर्जमाफीचे पैसे  न दिल्यास बेमुदत आंदोलन

नाबार्ड ने कर्जमाफीचे पैसे  न दिल्यास बेमुदत आंदोलन

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:31AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील 44 हजार 659 शेतकर्‍यांना 112 कोटी 89 लाख रुपयांची कर्जमाफी शासनाने केली; मात्र ही कर्जमाफी झालेली रक्कम शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय नाबार्डने शेतकर्‍याच्या खात्यांतून काढून घेतली.  या अपात्र ठरविलेल्या शेतकर्‍यांना मुंबई उच्च न्यायालयाने पात्र ठरविले आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार नाबार्डने व्याजासह ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यांत जमा करावी; अन्यथा नाबार्डच्या पुणे कार्यालयासमोर हजारो शेतकर्‍यांसह 22 जानेवारीपासून बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी अ‍ॅड. माणिक शिंदे, अशोक नवाळे, सखाराम पाटील, संभाजी चौगुले, पुंडलिक खोडवे आदींची उपस्थिती होती. यावेळी रघुनाथदादा म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यातील काही तक्रारीनंतर नाबार्डने हे पाऊल उचलेले होते. ही बाब अयोग्य होती. त्यामुळे नाबार्डने ही रक्कम परस्पर घेतल्याबद्दल शेतकरी संघटनेने 17 आक्टोबर 2013 रोजी जाब विचारला. त्यावेळी नाबार्डने हायकोर्टाचा निर्णय जो होईल, त्याप्रमाणे याबाबत अंमलबजावणी करण्याचे या अांदोलनादरम्यान मान्य केले होते. तसे लेखीही कळविले. मुंबई हायकोर्टाने 30 जानेवारीला शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला.

यावेळी न्यायालयाने या कर्जमाफीला अटी, शर्ती नव्हत्या, असे स्पष्ट केले. या निर्णयानुसार कर्जमाफीची रक्कम परत देण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे; मात्र या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. सध्या नाबार्डने 20 जानेवारीपर्यंत पैसे जमा न केल्यास नाबार्डच्या पुणे कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल. सध्याची कर्जमाफी फसवी  कर्जमाफीची रक्कम दीड लाख कशासाठी? हा आकडा काढणारे कोण? नियमित कर्ज भरले आहे, त्याला 25 हजार का? शेतमालाला भाव दिलेले नाही. त्यामुळे या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सध्याची कर्जमाफी फसवी आहे.