Fri, Apr 26, 2019 19:27होमपेज › Kolhapur › कोल्हापूर महापालिका ‘प्रायव्हेट लिमिटेड’!

कोल्हापूर महापालिका ‘प्रायव्हेट लिमिटेड’!

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 09 2018 12:07AMकोल्हापूर : सतीश सरीकर  

कोल्हापूर महापालिकेने खासगी एजन्सीला ठेका देऊन तब्बल 87 चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी महापालिका मुख्य इमारतीतील वॉचमन काढून त्यांच्या जागी नऊ खासगी सिक्युरिटी गार्ड नेमले आहेत. महापालिकेच्या सर्वच इमारतींच्या स्वच्छतेचा ठेकाही खासगी एजन्सीला देण्याचा प्रस्ताव आहे. परिणामी, रोजंदारी व ठोक मानधन पद्धतीला फाटा देऊन हळूहळू महापालिका प्रशासनाकडून अशा प्रकारे सर्व पदांची भरती प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात ‘कोल्हापूर महापालिकेची वाटचाल’ स्थानिक स्वराज्य संस्थेकडून खासगीकरणाकडे म्हणजेच ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या दिशेने सुरू झाली आहे. 

महापालिकेत सध्या 148 वाहने आहेत. यात महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, स्थायी सभापतीसह इतर सभापती व अधिकारी यांच्या वाहनांचाही समावेश आहे. त्याबरोबरच सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, गार्डन विभाग या प्रमुख विभागांना महापालिकेच्या वतीने वाहने दिली जातात. त्यासाठी महापालिका आस्थापनेवर ड्रायव्हरची 151 पदे मंजूर आहेत. यात कायम 57, ठोक मानधनावरील 25, रोजंदारीचे 20 व केएमटीकडील 49 ड्रायव्हरांचा समावेश आहे. केएमटीच्या 49 ड्रायव्हरमध्ये 39 ठोक मानधनचे आणि 5 रोंजदारी व 5 कायम ड्रायव्हर यांचा समावेश आहे. खासगी एजन्सीकडून ड्रायव्हर भरती झाल्यावर केएमटीचे ड्रायव्हर पुन्हा केएमटीकडे पाठविण्यात येणार आहेत. 

महापालिकेच्या वर्कशॉपमधून ड्रायव्हरचे काम तीन शिफ्टमध्ये चालते. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कार्यालयीन कामकाजाबरोबरच सकाळी सहा ते दुपारी दोन, दुपारी दोन ते रात्री दहा व रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत ड्रायव्हर असतात. वाहनांच्या संख्येत ड्रायव्हरची संख्या कमी पडू लागल्याने यापूर्वी महापालिका प्रशासनाने ठोक मानधनावर ड्रायव्हर भरती केली होती; परंतु पुन्हा ठोक मानधन किंवा रोजंदार कर्मचारी नोकरीत कायम करण्यासाठी न्यायालयात धाव घेत असल्याने महापालिका प्रशासनाने थेट खासगीकरणाचा फंडा आजमावला आहे. खासगी एजन्सीकडून घेण्यात येणार्‍या 87 चालकांमध्ये 10 जेसीबीचालकांचाही समावेश आहे. त्यामुळे संबंधित ड्रायव्हरला नोकरीवर वेळेत उपस्थित राहणे किंवा त्यांच्या पीएफ व इतर बाबींच्या जबाबदारीतून महापालिका प्रशासनाची सुटका होणार आहे. संबंधित एजन्सीवरच त्याची सर्वस्वी जबाबदारी राहणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांचे मत आहे.

मुख्य इमारतीत 9 खासगी सिक्युरिटी गार्ड
महापालिकेच्या मुख्य इमारतीत रोंजदारीवरील कर्मचारी वॉचमन म्हणून कार्यरत होते. त्यांना कामाचे दिवस भरतील त्यानुसार हजेरी होती. गेले 18 ते 20 वर्षे रोजंदारी करणार्‍या या कर्मचार्‍यांना  7 ते 8 हजार पगार यायचा. आता त्यांच्या जागेवर खासगी कं­पनीकडून नऊ सिक्युरिटी गार्ड नेमण्यात आले आहेत. त्यामुळे वॉचमन म्हणून काम करणार्‍या त्या कर्मचार्‍यांना इतर विभागांत समावून घेण्यात आले आहे. 

सफाईसाठीही खासगी एजन्सीचा प्रस्ताव
महापालिकेत सफाई कामगार आहेत. तरीही आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका मुख्य इमारत, सावित्रीबाई हॉस्पिटल, पंचगंगा रुग्णालयासह विभागीय कार्यालये व महापालिकेच्या प्रमुख इमारतीमधील सफाई व स्वच्छतेसाठी खासगी एजन्सीला ठेका देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. परिणामी, भविष्यात महापालिका इमारतीमधील सफाईचेही खासगीकरण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला सफाई कर्मचार्‍यांची गरजच उरणार नसल्याचे सांगण्यात येते. 
 

Tags : Kolhapur municipal corporation, private corporation