Tue, Feb 19, 2019 20:25होमपेज › Kolhapur › मायक्रो सावकारीचा ग्रामीण भागाला जीवघेणा विळखा

मायक्रो सावकारीचा ग्रामीण भागाला जीवघेणा विळखा

Published On: Dec 18 2017 2:33AM | Last Updated: Dec 18 2017 1:35AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील कदम

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच पद्धतीच्या खासगी सावकारीचा फैलाव होऊ लागला आहे. प्रामुख्याने गावोगावचे महिला बचतगट, मध्यमवर्गीय, छोट्या व्यावसायिक आणि मजुरी करणार्‍या महिला या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकत चालल्या आहेत. या कंपन्यांच्या बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्याचे अधिकार राज्य आणि स्थानिक पातळीवरील प्रशासनाला नसल्यामुळे या कंपन्यांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आजमितीला या कंपन्यांनी  ग्रामीण भागात जवळपास आठशे ते एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्याच्या बेकायदा वसुलीचा वरवंटा आता या भागातील सर्वसामान्य नागरिकांवर फिरू लागला आहे.

ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘मायक्रो फायनान्स’ ही संकल्पना उदयास आलेली आहे. ग्रामीण जनतेला त्यांचे त्यांचे लघुउद्योग, गृहउद्योग, पशुपालन, दुग्धव्यवसाय व अन्य छोट्या-छोट्या व्यवसायांसाठी सूक्ष्म स्वरूपात, कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास हातभार लावणे हा या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या मूळ हेतूच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला अल्प व्याजदरात, सूक्ष्म कर्जपुरवठा करण्यासाठी देशभरातील जवळपास शंभरहून अधिक ‘मायक्रो फायनान्स कंपन्यांना’ तशी परवानगी दिलेली आहे. 

केवळ नफा हे तत्त्व डोळ्यासमोर न ठेवता एक सामाजिक बांधिलकी या भावनेने या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी या क्षेत्रात काम करावे, असे रिझर्व्ह बँकेला अभिप्रेत आहे आणि तशाच स्वरूपाची याबाबतची नियमावलीसुद्धा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सगळी मार्गदर्शक तत्त्वे, नीतीनियम आणि कायदे-कानून पायदळी तुडवून काम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या मायक्रो फायनान्स कंपन्या म्हणजे जणू काही मान्यताप्राप्त खासगी सावकार होऊ लागल्या आहेत. कारण खासगी सावकारांप्रमाणेच या कंपन्यांचे कर्जवाटप, पठाणी पद्धतीचे व्याज आणि खासगी सावकारी धर्तीची वसुली सुरू असलेली दिसत आहे.