Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Kolhapur › 4 हजार महिलांकडून कुंकूमार्चन

4 हजार महिलांकडून कुंकूमार्चन

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची (अंबाबाई) मनभावी मूर्ती, दुतर्फा शिवछत्रपती व राजर्षी शाहू महाराजांचे पुतळे अशा भक्‍तिपीठासमोर हात जोडून मंत्रोच्चारात केशरी रंगाच्या साड्या परिधान केलेल्या तब्बल चार हजार महिला भाविक अशा वातावरणात रविवारी अंबाबाई मंदिराच्या पूर्वेकडील जुना राजवाडा परिसर मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाला. निमित्त होतं अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेस 302 वर्षे आणि श्री महालक्ष्मी अन्‍नछत्र सेवा ट्रस्टच्या  दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महाकुंकूमार्चन सोहळ्याचे. कोल्हापूरची पुरोगामी परंपरा जपणार्‍या या सोहळ्यात सर्व जाती-धर्मांतील महिलांनी आवर्जून सहभाग घेतला.

तब्बल चार हजार सुवासिनी महिलांनी भक्‍तिभावाने कुंकूमार्चन केले. सोहळ्याची सुरुवात  महापौर सौ. स्वाती यवलुजे यांच्या हस्ते देवीच्या आरतीने झाली. यानंतर शिवछत्रपती व राजर्षी शाहू यांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांसह उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचा उद्देश संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितला.   दरम्यान, महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे कुंकूमार्चन सोहळ्यासाठी लागणारे सर्व साहित्य मोफत पुरविण्यात आले. यात कुंकू, देवीच्या पादुका, भेटवस्तू, पाणी बॉटल, अल्पोपाहार व लाडू प्रसाद यांचा समावेश होता. सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. वेदमूर्ती सुहास जोशी व त्यांचे सहकारी विशाल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी व मंत्रोच्चार झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलचे पथक, रुग्णवाहिका व व्हाईट आर्मीच्या महिला प्रतिनिधी यांची फौज उपस्थित होती.