Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांनाही वाढीव पाणी बिलाचे चटके!

शेतकर्‍यांनाही वाढीव पाणी बिलाचे चटके!

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 11:22PMकोल्हापूर : नसिम सनदी 

शेतीसाठीची पाणीपट्टी आता क्षेत्राऐवजी घनमीटरनुसार आकारली जाणार आहे. त्यामुळे येथून पुढे पिकांनाही मीटरद्वारे मोजून पाणी द्यावे लागणार असून, मापूनच बिलही येणार आहे. जल प्राधिकरणाने 17 टक्के वाढ सुचवल्याने आताच्या पाणीपट्टीत साधारणपणे 234 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. मीटरवर आकारणी केल्यास एक लाख लिटर पाण्यासाठी हंगामनिहाय 450 ते 1,350 रुपये इतकी पाणीपट्टी भरावी लागणार आहे. 1 फेबु्रवारी 2018 पासून नवे दर लागू होणार आहेत. दरम्यान, आलेल्या हरकतींवर सुनावणी न घेताच जल प्राधिकरणाने परस्परवाढ जाहीर केल्याने याला कडाडून विरोधही सुरू झाला आहे.

शेतीसाठी नदी, कालवे, विहीर, तलाव आदी ठिकाणांहून पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाण्यावर पाटबंधारेची मालकी असल्याने त्यांच्याकडून हंगामनिहाय पाणीपट्टी आकारली जाते. त्यावर जिल्हा परिषदेचा 20 टक्के सेसही आकारला जातो. सध्या हेक्टर हे प्रमाण धरून त्याआधारे ठराविक पाणीपट्टी निश्‍चित केली गेली आहे. एक हेक्टरसाठी खरिपाला 40, रब्बीला 60, उन्हाळी 80, बारमाही 1,150 अशी पाणीपट्टी आहे, त्यात 20 टक्के सेस गृहीत धरून ही रक्कम अनुक्रमे 48, 72, 96, 1,380 रुपये इतकी होते. 2010 पासून याच दराने पाणीपट्टी आकारली जाते.

यातून पाटबंधारेला दरवर्षी 9 ते 12 कोटींची पट्टी मिळते. गेल्या नोव्हेंबरमध्ये प्रस्तावित वाढीच्या संदर्भात हरकतीही मागवल्या होत्या. आता प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यात केलेल्या शिफारशींनुसार कृषिपंपांसाठी दिले जाणारे पाणी वारेमाप न देता मोजून मापूनच द्यावे. त्यासाठी घनमीटरनेच शेतीला पाणीपट्टी आकारावी, असे धोरण निश्‍चित केले आहे. 

गावातील पाणीही लिटरमागे 5 पैसे महाग

जल प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या पाण्याच्या दरवाढीमुळे गावातील रोजचे पिण्याचे पाणीही लिटरमागे 5 पैशांनी महागणार आहे. पूर्वी 10 पैसे असा असणारा दर आता 15 पैसे होणार आहे. तथापि, दरमाणसी पाणी वापर मर्यादा 40 वरून 55 लिटरपर्यंत वाढवल्याने ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला दिवसाला 1 रुपया याप्रमाणे 360 रुपये असे सरासरी पाणी बिल आकारणी ग्रामपंचायतीकडून होत होती; पण पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी आणि पाणी मागणी वाढल्याने हा दर किमान 700 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 2010 मध्ये 10 पैसे प्रतिलिटर असा दर करण्यात आला.

त्याप्रमाणे दरमाणसी गुणोत्तर आणि मीटरद्वारे पाणी वापर यानुसार बिले काढली जाऊ लागली आहेत. त्यामुळे किमान 1 हजार ते 2 हजार रुपये अशी पाणीपट्टी आता सर्रास गावात आकारली जाते. आता जल प्राधिकरणाने दर वाढवल्याने प्रतिलिटर 5 पैशांची भर पडल्याने 55 लिटरला 2 रुपये 75 पैसे अधिक मोजावे लागणार आहे. त्यामुळे किमान 55 लिटर पाणी वापरण्यासाठी रोज 3 रुपये 35 पैसे आता मोजावे लागणार आहेत. त्याप्रमाणे हिशेब धरून कुटुंबातील पाणी बिल निश्‍चित होणार आहे.