Thu, Jun 27, 2019 15:52होमपेज › Kolhapur › जनतेच्या भाकरीचा विचार  करणारे म. गांधी पहिले नेते

जनतेच्या भाकरीचा विचार  करणारे म. गांधी पहिले नेते

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:04AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

महात्मा गांधी यांनी भारतातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला अत्यंत विचारपूर्वक व कल्पकतेने कृती कार्यक्रम दिला. लोकसंग्रहाचे दुर्मीळ कसब तर त्यांच्याकडे होतेच; पण या देशातील जनतेच्या भाकरीचा विचार करणारे ते  पहिले नेते  होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी शनिवारी येथे काढले. शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग व विदेशी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा इतिहास संशोधन केंद्रात प्राचार्य मेणसे यांचे ‘गांधी समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. नंदा पारेकर होत्या.

प्राचार्य मेणसे म्हणाले, देशातील सुमारे 80 टक्के जनता शेतकरी आहे. त्यांचे प्रश्‍न गंभीर आहेत. त्यांना वाचा फोडायला हवी म्हणून गांधींनी पहिल्यांदा चंपानेरचा नीळ सत्याग्रह उभारला. या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर संघटन होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने आपला लढा उभारला. यालाही तत्कालीन परिस्थिती कारणीभूत होती. एक तर सशस्त्र लढ्यानंतर स्वातंत्र्ययोद्ध्यांना तुरुंगात वीस-तीस वर्षे खितपत पडावे लागणार होते.  महत्त्वाचे मनुष्यबळ तुरुंगात जाऊ देणे परवडणारे नव्हते. त्याचप्रमाणे 1857 च्या लढ्यानंतर ब्रिटिश सरकारने इंडियन आर्मस् अ‍ॅक्ट 1858 आणला होता. या कायद्यामुळे संपूर्ण देश निशस्त्र झाला होता.

या परिस्थितीचे भान गांधींना होते. त्यामुळेच त्यांनी जनतेला छोटा कार्यक्रम द्यायचा, त्यासाठी मोठी शक्ती लावायची आणि तो कार्यक्रम यशस्वी करायचा, असे धोरण ठेऊन व्यापक लोकसहभाग मिळविण्यासाठी गांधीजींचे हे धोरण कमालीचे यशस्वी ठरले. पुढे टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्यलढ्याची व्याप्ती आणि आवेग वाढवत नेऊन अखेर 1942 मध्ये त्यांनी ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ.  पारेकर म्हणाल्या, महात्मा गांधी यांचे विचार व कार्य यांची प्रस्तुतता अजिबात कमी झालेली नाही, उलट वाढलेली आहे. त्यांच्याविषयी बुद्धीभेदी विकार पसरवणार्‍या विकारी प्रवृत्तींना चपराक देण्यासाठी तरुणांनी गांधी विचार व तत्त्वज्ञानाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची गरज आहे.  विदेशी भाषा विभागाच्या डॉ. मेघा पानसरे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. डॉ. नीलांबरी जगताप यांनी आभार मानले.