Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Kolhapur › कोल्हापुरी चप्पल उद्योगासाठी दिलासादायक बजेट

कोल्हापुरी चप्पल उद्योगासाठी दिलासादायक बजेट

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 02 2018 11:55PMकोल्हापूर : प्रतिनिधी

चप्पल आणि चामडी उद्योगासाठी आज बजेटमध्ये विशेष सवलतीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर चप्पल उद्योग-व्यवसायातून वर्गातून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात येत आहेत. या व्यवसायात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी प्रॉव्हिडंड फंडासाठी 150 दिवस रोजगाराची मर्यादा करण्यात आली आहे. यापूर्वी हा कालावधी 240 दिवसांचा होता. यासह पी.एफ.वर 30 टक्के बेनिफिट लागू राहणार आहे. याचा अर्थ कापड उद्योगासाठी जो पी.एफ.चा नियम लागू आहे. तीच सवलत चप्पल उद्योगासाठी लागू राहणार आहे. कोल्हापुरातील चप्पल उद्योगात साडेतीन हजारजण काम करत असल्याची आकडेवारी 2005 मध्ये लोकविकास केंद्राने केलेल्या 

सर्व्हेतून स्पष्ट झाले होते. सध्या यामध्ये कमी-जास्त कुटुंब कार्यरत असतील; पण अलीकडे तरुण पिढी या उद्योगाकडे मोठ्या प्रमाणावर वळू लागली आहे. याचे कारण सध्या चप्पलचे मार्केट वाढत चालले आहे. तसेच कोल्हापुरात येणार्‍या पर्यटकांकडून कोल्हापुरी चप्पल हमखास विकत घेतले जात असल्याचे चित्र आहे. या क्षेत्रातील कर्मचार्‍यांना याचा लाभ होणार असल्याने या उद्योगाच्या विस्तारासाठी ही प्रोत्साहानात्मक बाब असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आल्या. 

या निर्णयाचा कोल्हापुरातील कर्मचार्‍यांना फायदा होणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले. दुसर्‍या बाजूला कोल्हापुरात चप्पल व चामडी उद्योगात काम करणारा बहुसंख्य कर्मचारी हा अंगावर काम घेऊन काम करतो. त्यामुळे स्थानिक उद्योगातील कर्मचारी हा असंघटित क्षेत्रात जास्त मोडतो. परंतु, काही उत्पादक कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना मात्र याचा थेट लाभ होणार आहे.  आग्रा, कलकत्ता आदी भागात चप्पलचे बडे उद्योग आहेत. या उद्योग क्षेत्राला याचा मोठा लाभ होईल.

कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय ब्रँड

कोल्हापुरी चप्पल हे नैसर्गिक असल्याने आरोग्यदायी असते. हे चप्पल वापरल्याने आरामदायी अनुभव येत असल्याने याची मागणी जगभर आहे. वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आणि खास कौशल्याने ही चप्पल बनवली जाते. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल हा आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. सध्या या क्षेत्रात तरुण उद्योजक उतरू लागले आहेत.