Wed, May 22, 2019 21:01होमपेज › Kolhapur › पैशाच्या वादातून लक्षतीर्थ वसाहतीत तलवार हल्‍ला

पैशाच्या वादातून लक्षतीर्थ वसाहतीत तलवार हल्‍ला

Published On: Feb 28 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 1:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पैशाच्या वादातून लक्षतीर्थ वसाहतीत झालेल्या तलवार हल्ल्यात दोघे जखमी झाले. सुनील सर्जेराव पाटील (वय 30), केदार भागोजी गुरखे (वय 21, दोघे रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी सायंकाळी लक्षतीर्थमधील तळ्याजवळ ही घटना घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम लक्ष्मीपुरी पोलिसांत सुरू होते. जखमींकडून मिळालेली माहिती अशी, सुनील पाटील आणि संतोष बोडके यांच्यात पैशाच्या देवाण- घेवाणीतून गेले काही दिवस वाद सुरू आहे. उसणे दिलेले पैसे परत मिळावेत यासाठी सुनील पाटील वारंवार मागणी करीत होता.

मंगळवारी सायंकाळी लक्षतीर्थमधील तळ्याजवळ सुनील पाटील आणि बोडके यांच्यात वाद झाला. याच कारणातून चिडून पाटील आणि बोडके गटांतील तरुण एकमेकांना भिडले. बोडके याच्या गटातील केदार गुरखे याने मारलेला तलवारीचा वार सुनील पाटीलच्या डोक्यात लागला. तर त्याच्या गटातील एकाने केलेल्या मारहाणीत केदार गुरखेदेखील जखमी झाला. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्ष्मीपुरी पोलिसही सीपीआरमध्ये आले होते. सीपीआरमधील शस्त्रक्रिया विभागात दोघांवर उपचार सुरू असताना काही तरुण या ठिकाणी घुसले.

औषधोपचार सुरू असताना जखमींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाल्याने एकच धावपळ उडाली. डॉक्टरांनी आरडाओरडा करताच लक्ष्मीपुरी पोलिस धावत या ठिकाणी आले. मारहाण करून पळणार्‍या तरुणांचा पाठलाग करून पकडण्यात आले. पोलिस उपनिरक्षक स्मिता पाटील, प्रशांत कांबळे, हंबीरराव अतिग्रे या पोलिसांनी विजय बोडके याला पकडून ताब्यात घेतले. तर अन्य दोघे पसार झाले. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.