Tue, Apr 23, 2019 07:34होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : रस्ते, पाणी, लाईट, गटारींचा अभाव 

कोल्हापूर : रस्ते, पाणी, लाईट, गटारींचा अभाव 

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 22 2018 11:58PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकांमध्ये गठ्ठा मतदानासाठी सर्वाधिक डोळा असतो तो झोपडपट्टी परिसर व उपनगरांमधील लहान सोसायटी व कॉलनी. निवडणुकीच्यावेळी या उपनगरांमध्ये विकासकामाची अनेक आश्‍वासने दिली जातात; पण निवडून आल्यानंतर फारशी ती पाळली जात नाहीत म्हणूनच राजेेंद्रनगर मतदारसंघाशी जोडलेल्या उपनगरांमध्ये अजूनही रस्ते, पाणी लाईट गटर्सची समस्या कायम आहे. 

नवीन प्रभाग रचनेत राजेंद्रनगर मतदारसंघाशी वैभव हौसिंग सोसायटी, समता कॉलनी, ग्रीन पार्क, मोरेवाडी मुख्य रस्त्यासमोरचा भाग जोडला गेला आहे. काही भाग हा ग्रामपंचायतीत असल्यासारखे वाटते; पण मुळात महापालिका हद्दीत असल्याने दोन्ही विभागाकडून यातील अनेक परिसर हा विकासापासून वंचित राहिला आहे. समता कॉलनी सारखा भागात गेल्या दहा वर्षांपासून विकासकामांचा ठणठणाट आहे. या परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एकीकडे शहरात रस्ते चकाचक केले जात असताना  महापालिकेच्या हद्दीचा भाग असणार्‍या या परिसरात अजून  काही रस्त्यांना डांबरही लागले नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात कच्चा रस्त्यावरून वाहने चालवताना कसरत करावी लागते. 

 या परिसरांमध्ये गटर्स व ड्रेनेजची सोय नसल्याने हे पाणी थेट रस्त्यावर सोडले जाते. यामुळे डासांचा उपद्रव वाढत चालला आहे. औैषधांची फवारणी वेळेत केली जावी, अशी मागणी केली जात आहे; पण त्याची दखल घेतली जात नाही.

वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीन पार्क परिसरात, मोरेवाडी रोड परिसरात  स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कचरा उठावासाठी शहरात घंटागाडी येते, पण या उपनगरात आरोग्य विभागाचे कोणी कर्मचारी फारसे स्वच्छतेला जात नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. कचरा टाकण्यासाठी काही कॉलनीमध्ये कंटेनर देण्यात आले आहेत. ही चांगली बाब आहे, पण त्यातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेची गाडी लवकर येत नसल्याने कंटेनर मधून कचरा बाहेर पडतो. याच कचरा कंटेनरवर भटक्या कुत्र्यांचा वावर सुरू आहे. या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत महापालिकेला कळवूनही त्यांच्याकडून योग्य ती कार्यवाही केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.

या भागातून महापालिका घरफाळा, पाणीपट्टी वेळेत वसूल करते पण नागरिकांना सुविधा देण्यास टाळाटाळ करते. संबंधित यंत्रणेकडे तक्रार करूनही नागरी सुविधा पुरवण्यासाठी कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले. या परिसरात चोर्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर  जीव मुठीत घेऊन जगावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.