Sat, Nov 17, 2018 20:33होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : स्वच्छता, मैदान, भाजीमार्केटचा अभाव

कोल्हापूर : स्वच्छता, मैदान, भाजीमार्केटचा अभाव

Published On: Jun 24 2018 1:56AM | Last Updated: Jun 23 2018 11:28PMकोल्हापूर : प्रतिनिधी

उच्चभू्र लोकवस्ती आणि नव्याने वसलेल्या इमारतींनी रमणमळा परिसर व्यापला आहे. भागातील कचरा उठावासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यात यश आले असले तरी गटारींची व्यवस्था दयनीय आहे. गटारींसह ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांमधून होत आहे. न्यू पॅलेस परिसरात दुचाकींतील पेट्रोल चोरीच्या घटनांनी स्थानिक त्रस्त आहेत. 

पोवार मळा, वाघळे मळा, शासकीय धान्य गोडावून, बेडकर पार्क, छत्रपती पार्क, महावीर कॉलेज परिसर, न्यू पॅलेस परीसर, कसबेकर पार्क असा विस्तारला आहे. जुन्या भागातून गेलेले नाले, रस्ते झालेले नाहीत. तर काही भागात गटारींची कामे अर्धवट असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. कचरा उठाव नियमित होत असला तरी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. काही भागात अद्यापही शेती असल्याने येथे डासांचा प्रादुर्भावही मोठा आहे. मुलांसाठी मैदान, विरंगुळा केंद्र, भाजी मार्केट या पायाभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.भागातील लोकसंख्या पाच ते सात हजारांच्या घरात आहे. गेल्या काही वर्षात रमणमळा आणि आसपास परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून अनेक नूतन प्रकल्प आस्तित्वात आले आहेत. येथील अंगर्तग रस्ते, गटर्स, ड्रेनेजची व्यवस्था चांगली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

रमणमळा परिसरात मैदान उपलब्ध नसले तरी बगीचा आहे. तसेच कसबा बावड्याकडून आलेला 100 फुटी बायपास याच  परिसरातून जातो. नागरिकांची सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यास या रस्त्यावर मोठी गर्दी असते. कसबा बावड्याकडून हा रस्ता खानविलकर पंपानजीकच्या रस्त्याला जोडला जाणार आहे. मात्र, रमणमळा शासकीय गोदामाच्या पिछाडीस रस्त्याचे काम थांबले आहे. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशीही स्थानिकांची मागणी आहे. 

न्यू पॅलेस परिसरात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाणही वाढल्याने नागरीक हैराण आहेत. पोलिसांनी या प्रभागात गस्तीचे प्रमाण वाढविण्याचीही स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. पोलो मैदान ते रमणमळा भागात गटांरीअभावी काही परिसरात पावसाळ्यात दलदलीचा भाग निर्माण होतो. यामुळे येथे दुर्गंधीमुळे पावसाळ्यात साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. मुलांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा आहे. प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.