Fri, Jul 19, 2019 01:13होमपेज › Kolhapur › दिलबहार ची बालगोपाल वर मात

दिलबहार ची बालगोपाल वर मात

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 1:02AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

चुरशीच्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाचा एकमेव गोलने पराभव करून दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ संघाने ‘केएसए’ लिग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारच्या सामन्याच्या प्रारंभीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करण्यात आला. आघाडीसाठी योजनाबद्ध चढाया सुरू होत्या. दिलबहारकडून इचिबेरी इम्यान्यूअल, विकी सुतार, किरण चौकाशी, निखिल जाधव, जावेद जमादार, राहुल तळेकर यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले. यात त्यांना 40 व्या मिनिटाला यश आले. जावेद जमादारच्या उत्कृष्ट पासवर ईचिबेरी इमॅन्यूअल याने बिनचूक गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 

उत्तरार्धात बालगोपालकडून गोल फेडण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न सुरू होते. सूरज जाधव, बबलू नाईक, ऋतुराज पाटील, रोहित कुरणे, ईमीजी डोलस्की, सचिन गायकवाड, आशिष कुरणे यांनी लागोपाठ चढाया केल्या. मात्र, दिलबहारच्या भक्कम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. दिलबहारकडूनही आघाडीत भर घालण्यासाठी चढाया सत्र सुरूच होते. मात्र, बालगोपालचा गोलरक्षक निखिल खन्नाच्या उत्कृष्ट गोल रक्षणामुळे दुसरा गोल होऊ शकला नाही. यामुळे सामना दिलबहारने एकमेव गोलने जिंकला.