कोल्हापूर : प्रतिनिधी
बलाढ्य कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघाचा केएसए चषक वरिष्ठ गट साखळी सामन्यात रविवारी संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने 3-0 अशा गोल फरकांनी पराभव केला.ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू आहे. संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा खेळाडू नीलेश सावेकरच्या पासवर 20 व्या मिनिटाला महेश पाटील याने गोल नोंदवून संघास 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करण्यासाठी कोल्हापूर पोलिस संघाकडून शर्थीचे प्रयत्न झाले; पण बुधवार पेठेच्या संघाने तोडीस तोड उत्तर दिल्याने कोल्हापूर पोलिस संघ हातबल झाला.पूर्वार्धात 1-0 गोलची आघाडी संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने कायम ठेवली.
उत्तरार्धात देखील संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने जिगरबाज खेळ करून उपस्थितांची मने जिंकली. 48 व्या मिनिटाला दिग्विजय सुतार ने मैदानी गोल नोंदवत संघास 2-0 गोलची आघाडी मिळवून दिली.गोलची परत फेड करण्यासाठी सौरभ पोवारच्या पासवर लखन मुळीकने गोलची संधी दवडली. जुना बुधवारच्या भक्कम बचाव फळीपुढे पोलिसांचा संघ हातबल झाला. संघाच्या शुभम संकपाळ, युक्ती ठोबरे, संतोष तेलंग, सौरभ पोवार, सोमनाथ लांबोरे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. 62 व्या मिनिटाला बुधवार पेठेच्या नीलेश सावेकरच्या पासवर मनोहर तारळेकरने गोल नोंदविला. 3 विरुद्ध 0 गोलची आघाडी कायम ठेवत संघाने सामना जिंकला. संघाच्या प्रसाद पाटील, महेश पाटील, दिग्विजय सुतार, मोहम्मदीन शेख यांचा खेळ चांगला झाला.