कोल्हापूर ः प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापेक्षा दोन दिवसांत शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. दोन दिवस कमीत कमी तापमान 14.3 अंश सेल्सियस होते. तेच शुक्रवारी (दि. 29) 14.1 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले आणि यंदाच्या हिवाळ्यात सर्वाधिक थंडीची नोंद झाली. त्यामुळे दिवसभर थंडीने अनेकांना हुडहुडी भरली. हवेत प्रचंड गारवा असल्याने सर्दी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.29) झाली असल्याचे हवामान खात्याचे येथील सहायक वैज्ञानिक आर. एच. घाटगे
यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यापर्यंत कोल्हापूर शहरात कमीत कमी तापमान 14.3 अंश सेल्सियसपेक्षा अधिक होते. आठवडाभरापासून ते घटू लागले आहे. बुधवारपर्यंत कमीत कमी तापमान 14.4 अंश सेल्सियसपर्यंत होते. गुरुवारी ते 14.3 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले आणि शुक्रवारी तर 14.1 अंश सेल्सियसपर्यंत पारा खाली घसरला. त्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी पहाटेपासूनच थंडीची तीव्रता अधिक वाढली. सकाळी फिरायला जाणार्यांपैकी अनेकांना शुक्रवारी थंडीने हुडहुडी भरली. भरदुपारी उन्हात उभे राहून अनेक जण थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. थंडीमुळे पायांना आणि ओठांना भेगा पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवसभर बहुतेक जण स्वेटर आणि कानटोपी घालूनच घराबाहेर पडत असल्याचे चित्र होते. मोटारसायकलस्वारांनी तर स्वेटर अथवा जर्किनबरोबरच कानटोपी, हेल्मेटसह विविध उपाय थंडीपासून वाचण्यासाठी शोधल्याचे दिसत होते.
हवामानात अचानक गारवा वाढल्याने सर्दी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे चित्र आहे. सर्दी आणि तापावरील उपचारासाठी लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. सर्दी आणि तापाच्या आजारापासून बचाव करण्यासाठी थंडीत उबदार कपडे, कानटोपीचा वापर आवश्यक आहे, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.