कोल्हापूर : दिलीप भिसे
गेल्या काही वर्षांपासून संघर्ष, मारामार्या, खून, दरोडे आणि दहशतीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्यात वाढलेल्या संघटित गुन्हेगारीने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. संघटित टोळ्यांच्या दहशतीची स्टाईल बदलली आहे. तलवारी, कोयत्यासह जांबियासारख्या धारदार शस्त्रास्त्रांबरोबरच ‘घोड्या’चा (पिस्टल) ट्रेंड रूढ होऊ पाहतोय. एकापेक्षा एक सरस, अत्याधुनिक बनावटीची शस्त्रे आता सहज गुन्हेगारांच्या हाताला लागली आहेत. शस्त्र तस्करी उलाढालीत कोल्हापूर हे केंद्र बनते की काय? अशी भीती उपस्थित केली जाऊ आहे.
राजकीय आश्रयान बोकाळलेल्या आणि पडद्याआडून सराईत टोळ्यांवर हुकूमत गाजविणार्या म्होरक्यांच्या हालचाली धोकादायक, सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्या ठरत आहेत. प्रतिस्पर्ध्यांची जिरविण्यासाठी प्याद्याप्रमाणे गुन्हेगारांचा सर्रास वापर होऊ लागल्याने बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकातील कुख्यात तस्करी टोळ्यांची वर्दळ वाढू लागली आहे. जरगनगर-पाचगाव मार्गावर ‘अण्णा ग्रुप कट्टा’ चौकात चार दिवसांपूर्वी पिस्तुलातून डोक्यात गोळ्या झाडून एका तरुणाचा खून झाला. वर्चस्ववाद की टोळीयुद्धातून हा प्रकार घडला, यापेक्षा मध्यवर्ती चौकात गोळ्या झाडून मारेकर्याने दहशत माजविली. हा प्रकार घातक ठरणारा आहे. मारेकर्याला पिस्तूल कोठून मिळाले याचा तपास घेण्याची गरज आहे.
दोन वर्षांत जिल्ह्यात पन्नासांवर शस्त्रे हस्तगत
कोल्हापूर पोलिसांनी दोन वर्षांत शहर, जिल्ह्यात बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगणार्या सराईतांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत पन्नासांवर शस्त्रे हस्तगत केली आहेत. त्यामध्ये गावठी कट्टे, रिव्हॉल्व्हर, पिस्टल, सिंगल बोर, डबल बोर अशा शस्त्रांचा समावेश आहे.
‘मागणी तसा पुरवठा!
शहर, जिल्ह्यातील बहुतांशी गुन्हेगारी टोळ्यातील साथीदाराकडे अत्याधुनिक बनावटीची शस्त्रे पोलिसांना आढळून आली आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्लीसह कर्नाटकातून घातक शस्त्रांची ‘मागणी तसा पुरवठा’ तत्त्वावर उलाढाल होत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.
सावकारी वसुलीसाठी सशस्त्र गुंडांची फौज
खासगी सावकारीतील उलाढालीसाठी जिल्ह्यात शस्त्रधारी सराईत टोळ्यांचा सर्रास वापर सुरू झाला आहे. ग्रामीण भागात हा प्रकार प्रकर्षाने दिसून येतो. जीवघेण्या शस्त्रांच्या धाकाने अपहरणासह स्थावर मालमत्ता हडपण्याचा फंडा जिल्ह्यात सुरू झाला आहे. शस्त्रांच्या धाकावर सावकारी टोळ्यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरल्याचे चित्र आहे.
सर्व्हिस रिव्हॉल्व्हरपेक्षा सरस अन् अत्याधुनिक हत्यारे सहज उपलब्ध
पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होणारी गावठी बनावटीची शस्त्रे कंपनीनिर्मित शस्त्रापेक्षा किती तरी पटीने सरस आणि अत्याधुनिक दर्जाची निर्मिती असल्याचे दिसून येते.शिवाय, वजनानेही हलके, खिशात सहज ठेवता येणार्या शस्त्रांच्या खरेदीचा व्यवहारही प्रत्यक्ष न करता केवळ सांकेतिक कोडद्वारे उलाढाल केली जाते. ठराविक रक्कम ऑनलाईन जमा केल्यास काही दिवसांत म्हणेल त्या ठिकाणी शस्त्रे पुरविण्याची शंभर टक्के हमी देण्यात येते. त्यामुळेच सराईतांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदीची उलाढाल सुरू झाली आहे.