Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Kolhapur › उद्योगांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा

उद्योगांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा

Published On: Dec 19 2017 1:59AM | Last Updated: Dec 18 2017 11:12PM

बुकमार्क करा

कोल्हापूर :  सचिन टिपकुर्ले 

सरकार कोणतेही असो पण वाढत्या वीज दरवाढीचे  उद्योजकांवरील संकट कायम आहे. वारंवार मागणी करूनही हे दर कमी न झाल्याने स्पर्धात्मक बाजारपेठेत स्थानिक उद्योजकांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. नवोदित उद्योजकांसाठी सुरू केलेल्या योजनांचा कोल्हापूरला उपयोग झाला नाही. जीएसटी कर प्रणालीमुळे कमी झालेल्या  इन्स्पेक्टर राजचा  उद्योगांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  पण अजूनही सरकारच्या धोरणांचा थेट फायदा उद्योगांना मिळत नसल्याने उद्योजक अच्छे दिनच्या प्रतीक्षेत आहेत. 

राज्यात उद्योगांच्या वीज दर वाढीविरोधात सर्वात पहिले आंदोलन कोल्हापूरच्या उद्योजकांनी सुुरू केले. लगतच्या राज्यातील उद्योजकांचे विजेचे दर व महाराष्ट्रातील विजेचे दर यात मोठी तफावत आहे. वस्तूचे उत्पादन करत असताना  येणारा खर्च व अन्य राज्यांत येणारा खर्च केवळ विजेच्या दरामधील तफावतीमुळे कमी-जास्त होत असे. महाराष्ट्रातील उत्पादने दर्जेदार असूनही विजेच्या वाढीव दरामुळे त्यात तफावत आढळून येते. महावितरण, महा-जनको यांचे वीज उत्पादनासाठीचा खर्च, महागडी वीज खरेदी करणे, वीज गळतीचे वाढीव प्रमाण याचा बोजा उद्योगांवर येऊन पडला आहे.   राज्यातील औद्योगिक संघटनांनी याबाबत शासनाशी चर्चा केली; पण त्यात यश आले नाही.

विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात विजेचे दर वेगळे  एकीकडे अन्य राज्यांतील विजेचे दर महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत. अन्य राज्यांप्रमाणे उद्योगांच्या विजेचे दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी होत असतानाच राज्य शासनाने उद्योगांच्या वीजदरात दुजाभाव केल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तेथील उद्योगांचे वीज दर कमी केले आहेत. त्यामुळे तेथील उत्पादनाचा खर्च कमी तर पश्‍चिम महाराष्ट्रातील त्याच वस्तूंचा उत्पादन खर्च वाढत आहे. अशाने आपल्याच राज्यातील उत्पादनांशी उद्योजकांना स्पर्धा करावी लागत असून भविष्यात स्पर्धेतूनच बाहेर पडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली  आहे. 

कोल्हापुरातील अनेक उद्योग केवळ विजेच्या वाढीव दरामुळे कर्नाटकमध्ये स्थलांतरित झाले. कर्नाटक उद्योजकांसाठी जणू पायघड्याच घातल्या. मेक इन इंडियाबरोबरच मेक इन महाराष्ट्र असे आवाहन केले जात असताना कर्नाटकमध्ये जाणारे उद्योग महाराष्ट्र सरकार रोखू शकले नाही. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियामुळे  नवीन उद्योग आले नाहीत. सध्या मंदीचे सावट काही प्रमाणाम कमी होत असल्याचे उद्योजकांकडून सांगितले जात आहे.

 उद्योगांच्या विस्तारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जागेची मागणी होत आहे; पण अजूनही शासनाकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे उद्योगांच्या विस्ताराला मर्यादा येत आहेत. कोल्हापुरात पूर्वीचेचे उद्योजक आहेत. नवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी बाहेरून कोणताही मोठा उद्योग कोल्हापुरात सध्या तरी आलेला दिसत नाही. त्यामुळे केंद्र व राज्यांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जेव्हा एखादा मोठा उद्योग कोल्हापूर किंबहुना पश्‍चिम महाराष्ट्रात अवतरेल तेव्हा लघु व मध्यम उद्योगांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा उद्योगांमधून व्यक्त केली जात आहे.