Sat, Aug 24, 2019 18:58होमपेज › Kolhapur › हुपरी पेयजल योजनेचा गुंता सुटेना

हुपरी पेयजल योजनेचा गुंता सुटेना

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:23AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

हुपरी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर पूर्वी सुरू असलेली राष्ट्रीय पेयजल योजना कोणाकडे वर्ग करायची, यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे, तर नूतन नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी सर्वसाधारण सभाच निर्णय घेईल, असे सांगून चेंडू टोलवला आहे. जि.प. व नगरपरिषदेतील या टोलवाटोलवीमुळे मात्र ही योजना शेवटच्या टप्प्यात रखडल्याने हुपरीवासीयांना पाण्यासाठी चार चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. स्थानिक राजकारणामुळे बिले थकल्याने ठेकेदारानेही पाठ फिरवल्याने योजनेचा गुंता अधिकच वाढत चालला आहे.

यासंदर्भात हुपरीच्या जि.प. सदस्या स्मिता विरकुमार शेंडुरे यांनी सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीतही चर्चा होऊन  नगरपरिषकडे असणारे 83 लाख रुपये आपल्याकडे वर्ग करून घेऊन जि.प.मार्फतच ही योजना पूर्ण करावी, असा ठराव करण्यात आला आहे.  हुपरीमध्ये 30 ते 35 वर्षांपूर्वीची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आहे. ती वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरी पडत असल्याने 2007 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. 2009 मध्ये काम सुरू झाले; पण स्थानिक राजकारणामुळे काम रखडत गेल्याने बजेट वाढले. अखेर 2014 मध्ये 14 कोटी रुपयांचा निधी यासाठी लावून कामे जलदगतीने हाती घेण्यात आली.

त्यानुसार प्रस्तावित 4 टाक्यापैकी 3 टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. याचे बिल देण्याबाबत तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीकडून टाळाटाळ सुरू झाली. 50 लाखांचे बिल थकल्याने ठेकेदार अतुल पाटील यांनी दीड वर्षापासून कामच बंद केले आहे. पेयजलचा 60 लाखांचा हफ्ता आला आहे; पण जोपर्यंत मागील कामे पूर्ण होत नाही तोवर तो दिला जाणार नसल्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतल्याने हे पैसे खात्यावर पडून आहेत. त्यामुळे आता ही योजना जि.प. करणार की नगरपरिषद याचा गुंता तातडीने सुटण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.