होमपेज › Kolhapur › हाऊसफुल्ल गर्दीचा सुपर संडे!

हाऊसफुल्ल गर्दीचा सुपर संडे!

Published On: Dec 25 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 12:28AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

सलग सुट्ट्यांनी शहर पर्यटकांनी फुलून गेले आहे. पर्यटकांसाठी हा दिवस ‘सुपर संडे’ ठरला. शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने काही रस्त्यांवर वाहनांची कोंडी जाणवली. अंबाबाई मंदिरासह जोतिबा, पन्हाळा, राधानगरी या ठिकाणी मोठी गर्दी  होती.  रविवारी पर्यटकांच्या गर्दीने शहर फुलले होते. अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील वाहतूक कोंडीने काही काळ शहरवासीयांचा श्‍वास कोंडला. 

अंबाबाई मंदिरपासून भवानी मंडपपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. चार ते पाच पदरी रांगांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त  झाले. शहरातील सर्व पार्किंगची ठिकाणे वाहनांनी भरली होती. पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने शिवाजी स्टेडियम येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दुपारनंतर स्टेडियमचा निम्मा भाग वाहनांनी फुल्ल झाला होता. 

पन्हाळा फुल्ल! 

 ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावर सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. पन्हाळा येथील सर्व हॉटेल्स फुल्ल झाले असून, पर्यटकांना निवास व्यवस्था नसल्याने निराश होऊन कोल्हापूरला परत जावे लागत आहे. खानावळी, झुणका-भाकर केंद्रांवरदेखील खवय्यांची गर्दी असून, अंधारबाव, पुसाटी बुरूज, तबक उद्यान, तीन दरवाजा, सज्जाकोठी या ठिकाणी पर्यटकांचे जथ्थे दिसत आहेत. पन्हाळ्याचा इतिहास सांगणारे मार्गदर्शक यांच्यासाठी हा हंगाम लाभदायक ठरला असून, आठवडाभर पन्हाळा पर्यटकांनी फुलणार आहे. 

पन्हाळ्यात पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा करण्यात आल्या असून, पर्यटकांनी प्लास्टिक पिशव्या आणू नयेत, गडावर कुठेही प्लास्टिकचे ग्लास, बाटल्या फेकू नयेत, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तबक वन उद्यानात पर्यटक मोठी गर्दी करत असून, येथे पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सुविधा केली आहे. दिवसभर वर्दळ असल्याने वाहने पार्क करण्यास तळावर जागा मिळत नसल्याचेे रविवारी चित्र होते. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केलेली दिसत होती. जकात नाका येथे पन्हाळा पोलिसांनी दिवसभर वाहने तपासूनच गडावर सोडली. त्यामुळे हुल्लडबाजी करण्यास येणार्‍या पर्यटकांना आळा बसला. पन्हाळा पोलिस दिवसभर ठिकठिकाणी गस्त घालताना दिसत होते.

पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन गरजेचे... 

कोल्हापूरला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वर्षभर देशासह जगभरातील पर्यटक  कोल्हापूर पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. मात्र, या पर्यटकांना सोयीसुविधा देणार्‍या उपाययोजनांचे नियोजन नसल्याचे वास्तव आहे. याचा त्रास पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. पार्किंग व्यवस्थाच नाही  कोल्हापुरात येणार्‍या पर्यटकांसाठी बिंदू चौक, बाबुजमाल आणि दसरा चौकात मर्यादित पार्किंग व्यवस्था आहे.

मेन राजाराम हायस्कूलच्या मैदानाला मर्यादा आहे. शिवाय, मनपाच्या दुर्लक्षामुळे शहरातील स्थानिक लोकांनी पार्किंगच्या जागी व्यावसायिक दुकानगाळे काढल्याने त्यांची वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. पर्यटकांचे पार्किंग आपल्या दारात होऊ नये याची खबरदारी मात्र स्थानिक लोक आवर्जून घेताना दिसतात. यामुळे गर्दीच्या वेळी बाहेरून येणार्‍या पर्यटकांना वाहने लावायला जागा मिळत नाही. पार्किंगसाठी जागा शोधण्यासाठी शहरभर फिरावे लागते. 

दिशादर्शक यंत्रणेचा अभाव वर्षभर लाखोंच्या संख्येने कोल्हापुरात पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी दिशादर्शक यंत्रणा अत्यावश्यक आहे. मात्र, कोल्हापुरात या यंत्रणेचा अभाव असल्याचे दिसते. 
यंत्रणांचा समन्वय गरजेचा कोल्हापूर जगाच्या पर्यटन नकाशावर पर्यटकांचे सर्वाधिक आवडीचे ठिकाण म्हणून नावारूपाला आले आहे. संपूर्ण जिल्हाभर हे पर्यटन विखुरले आहे. यामुळे इथल्या पर्यटन व्यवसायाच्या विकासाला प्रचंड संधी आहेत. ही संधी साधण्यासाठी इथल्या प्रत्येक घटकाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्हा व मनपा प्रशासन, पोलिस व वाहतूक यंत्रणा, हॉटेल व्यावसायिक व टूर्स कंपन्या, पर्यटन गाईडस्,  रिक्षा-टॅक्सी वाहतूक करणारे लोक यासह स्थानिक नागरिक अशा प्रत्येक  घटकाचा समन्वय गरजेचा आहे.   

जीव मुठीत धरून पायपीट पर्यटकांना अक्षरश: जीव मुठीत धरून पायपीट करावी लागत आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनाला जाताना दसरा चौक, संभाजीनगर अशा लांबच्या ठिकाणी वाहन पार्क करून सुमारे दीड ते दोन कि.मी.चे अंतर पायी चालत जावे लागते. बॅगांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, सहलीसाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना वाहनांपासून जीव वाचवत चालावे लागते. मंदिरासभोवती पार्किंग स्पॉट शोधून, स्थानिकांना त्रास न होता त्याच्या योग्य नियोजनाची गरज आहे.