Tue, Apr 23, 2019 14:14होमपेज › Kolhapur › दवाखाना परिसरात तंबाखू विक्रीस बंदी

दवाखाना परिसरात तंबाखू विक्रीस बंदी

Published On: Dec 30 2017 1:48AM | Last Updated: Dec 30 2017 1:31AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शाळा, महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांबरोबरच आता शासकीय दवाखान्याच्या 100 यार्ड परिघात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्यान्वये बंदी असून नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी शुक्रवारी दिले. तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. काटकर म्हणाले, अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे, असे फलक दुकानावर लावणे विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करणारे व्यक्ती 18 वर्षांखालील आहे किंवा नाही हे ओळखण्याची जबाबदारी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांची आहे.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात करण्यावर बंदी करण्यात आली आहे, तसेच उत्पादकांना सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा पुरुस्कृत करता येणार नाही, देणगी, शिष्यवृत्ती, बक्षिसे याद्वारेही तंबाखूजन्य पदार्थांचे ब्रँड नाव व ब्रँड चिन्हे प्रदर्शित करता येणार नाहीत. याबरोबरच  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टनवर चित्रमय धोक्याची सूचना छापने बंधनकारक असून ही सूचना तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टनाच्या कमीत कमी 80 ते 85 टक्के भागात छापने बंधनकारक आहे. तंबाखू नियंत्रण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करा, असे सांगत काटकर म्हणाले, आरोग्य कर्मचारी, राष्ट्रीय बाल स्वाथ पथके, शिक्षण विभाग, पोलिस, अन्न व औषध प्रशासन अशा सर्व विभागांचे सहकार्य घ्या, तंबाखू सेवनाने जगामध्ये जवळपास 60 लक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. 2030 पर्यंत जगामध्ये 80 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू तंबाखूच्या सेवनाने होण्याची शक्यता आहे.

भारतात दरवर्षी 8 ते 9 लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होत असून तंबाखू सेवनापासून जनतेला परावृत्त करणे हे सर्वांचे आद्यकर्तव्य असून या कामास संपूर्ण समाजाने प्राधान्य देण्याची त्यांनी केली.
जिल्हा सल्लागार शिल्पा बांगर यांनी स्वागत केले. या बैठकीत गेला महिनाभर राबविण्यात आलेल्या मूख स्वास्थ्य मोहिमेची माहिती देण्यात आली. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या अशासकीय सदस्यांचा काटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अरुण वाडेकर, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह समितीचे सदस्य बाळासाहेब भोसले, मेघाराणी जाधव, दीपक ढाले, डॉ. सदानंद राजवर्धन, प्रा. धनाजी मोरुसकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.