Tue, Jul 23, 2019 02:53होमपेज › Kolhapur › शिवरायांची आदर्श तत्त्वे आचरणात आणा

शिवरायांची आदर्श तत्त्वे आचरणात आणा

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अठरा पगड जाती-जमातींच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज फक्‍त पुतळा, व्याख्यानातून नको, तर त्यांची आदर्श तत्त्वे आचरणात आणण्याची गरज आहे, असे विचार इतिहास अभ्यासक भिकाजी मगदूम यांनी व्यक्‍त केले. शिवजयंतीनिमित्त संयुक्‍त मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समिती, सकल मराठा मावळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. मिरजकर तिकटी येथे हा कार्यक्रम झाला.

छत्रपती शिवरायांची राजनीती, समाजाप्रती असलेली कनव याची उदारहणे देत मगदूम म्हणाले, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांचे उत्तम संस्कार घेऊन युद्धकलेत पारंगत झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी  रयतेचे राज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. जात, धर्म, पंत न मानता येतील त्यांना बरोबर घेऊन मोगलशाहीशी लढत दिली. मोगलांकडे असलेला एक एक गड जिंकत महाराजांनी रायगडावर रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली.

स्वराज्याच्या स्थापनेबरोबर स्वाभिमानी विचारांचे मावळेही तयार केले. महिलेची अब्रू लुटणार्‍या पाटलाचा उजवा हात व डावा पाय तोडून त्याचा पाळणा केला; पण आज अत्याचार झालेल्या भगिनीवर आयुष्य संपविण्याची वेळ येते, अत्याचार करणारा मात्र उजळ माथ्याने फिरतो, ही  परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची तत्त्वे आणि विचार अमलात आणण्याची गरज आहे. यावेळी स्वप्निल पार्टे, उमेश पोवार, निवास शिंदे, अमोल गायकवाड, युवराज पाटील, अनिकेत सावंत, शेखर केणे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.