Fri, Apr 19, 2019 12:11होमपेज › Kolhapur › पालकमंत्र्यांची नाराजांसोबत डिनर डिप्लोमसी

पालकमंत्र्यांची नाराजांसोबत डिनर डिप्लोमसी

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

निधीअभावी तटलेली विकासकामे, आलेला निधी दक्षिणमध्येच मुरवण्यावरून सत्ताधारी सदस्यांमध्येच वाढीस लागलेली धुसफूस, त्यातून तोंडावर आलेल्या वर्षपूर्तीआधीच पदाधिकारी बदलासाठी इच्छुकांनी खालेली उचल या पार्श्‍वभूमीवर अस्वस्थ सदस्यांची समजूत काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिनर डिप्लोमसीचा आधार घेतला. शहरातील एका हॉटेलमध्ये सत्ताधारी सदस्यांना जेवण देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेत, निधीचे आश्‍वासन देत दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याचेही आश्‍वासित केले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप प्रणित आघाडीची सत्ता आली आहे. येत्या मार्चमध्ये सत्तेवर येऊन वर्ष होत आहे; पण गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेत कोणतेही भरीव काम झालेले नाही. शासनानेही जि.प. ला दिल्या जाणार्‍या निधीत 30 टक्के कपात केली आहे.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील 5 लाखांव्यतिरिक्त एक रुपयाचा निधी सदस्यांना मिळालेला नाही. त्यामुळे सत्ताधारी असलेल्या सदस्यांसह पाठिंबा देणार्‍या घटक पक्षाच्या पाच सदस्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कमालीची धुसफूस सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून तर त्याची जाहीर वाच्यता सुरू झाली होती. याशिवाय वर्षभरानंतर पदाधिकारी बदल करण्यासंदर्भात सत्तास्थापनेवेळी चर्चा झाली होती. त्याची आठवणही काही सदस्य वारंवार करून देत होते. तसेच नाराज सदस्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन निधीत भेदभाव होत असल्याचे कानावर घातले होते. तसेच वेगळा विचार करण्याचा इशाराही दिला होता. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर चर्चा वाढत गेल्यास काठावरचे बहुमत असलेल्या जिल्हा परिषदेतील सत्तेवर परिणाम होऊ शकतो हे लक्षात आल्याने खुद्द पालकमंत्र्यांनीच यात लक्ष घालण्याचे ठरवले. त्यामुळेच शनिवारी संध्याकाळी 7 ते रात्री साडे आठ या वेळेत हॉटेलमध्ये सत्ताधारी 37 सदस्यांना समवेत घेऊन पालकमंत्र्यांनी सदस्यांना भरघोस निधी देण्याचे आश्‍वासन केले. 30 टक्के कपात केलेला निधीही परत मिळवून देऊ त्यासाठी केवळ रस्त्यांचे प्रस्ताव देण्यापेक्षा वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्राधान्याने फॉर्म द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. विविध 137 योजनांतून निधी येत आहे, त्यासाठी तातडीने प्रस्ताव द्या, मंजूर करून देऊ असेही आश्‍वासित केले. या बैठकीला आमदार अमल महाडिक, जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक, विषय समिती सभापती यांच्यासह सत्ताधारी गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.