Tue, Apr 23, 2019 18:23होमपेज › Kolhapur › पोलिसांच्या सद्भावना मेळाव्याने स्नेह वृद्धिंगत

पोलिसांच्या सद्भावना मेळाव्याने स्नेह वृद्धिंगत

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 15 2018 1:45AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

दंगलीचा आगडोंब तत्कालिक असतो; पण माणुसकीचा झरा कायमस्वरूपी प्रवाहित राहतो, याचा प्रत्यय रविवारी (दि.14) येथे आला. नववर्षाचे स्वागतच राज्यभर दंगलीने झाल्याने पोलिस दलातर्फे आयोजित सद्भावना मेळावा याचे निमित्त ठरला. पोलिस मुख्यालयाच्या आवारातील उद्यानात झालेला हा समारंभ म्हणजे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांचा स्नेह वृद्धिंगत करणारा गोडवा ठरला. उपस्थितांनी तीळगूळ देऊन एकमेकांचे तोंड गोड करीत समाजमनातील कटूता दूर करण्याचा खास प्रयत्न केला.

जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते आणि सहकार्‍यांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक  डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक  डॉ. योगेश जाधव, महापौर सौ. स्वाती यवलुजे, आ. राजेश क्षीरसागर, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. अमल महाडिक, पुण्याचे खासदार अमर साबळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व जाती-धर्मांचा सलोखा आणि सामाजिक एकता ही राजर्षी शाहू महाराजांची  शिकवण या सद्भावना मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठळक झाली.

समाजातील एकोप्याची नाळ कायम राहण्यासाठी सर्व समाज घटक प्रयत्नशील राहतील, अशी सद्भावना मेळाव्यातून व्यक्त करण्यात आली. भीमा कोरेगाव घटनेनंतर कोल्हापुरात घडलेल्या दगडफेकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाच्या वतीने शहर आणि जिल्ह्यात सामाजिक सलोखा रहावा, यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने माणुसकीची एक उंची गाठली. प्रारंभी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या अप्रिय घटनांनी राज्यातील वातावरण ढवळले. भीमा कोरेगावमध्ये जे घडले, त्यामागे समाजकंटकांचा हात असल्याचे उघड झाले आहे.

यातून समाज सावरला पाहिजे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी एकात्मतेची बीजे पुन्हा रोवली जाणे आवश्यक आहे. या हेतूने सद्भावना मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ‘जागो हिंदुस्थानी’ या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सारे जहाँ से अच्छा‘, ‘जहा डाल, डाल पर’, ‘मेरे देश की धरती‘ अशा बहारदार गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. याचवेळी एकमेकांना तीळगूळ देऊन उपस्थितांनी एकमेकांशी स्नेह वृद्धिंगत केला. हस्तांदोलन करीत सामाजिक एकोपा टिकविण्याच्या एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. तशी एकतेची शपथही घेतली.
मृतांना श्रद्धांजली राज्यात गेले दोन दिवस तीन भीषण घटना घडल्या.

डहाणूजवळील समुद्रात ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळून पाच कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. डहाणू येथेच समुद्रात बोट उलटून चार विद्यार्थी बुडाले. सांगली जिल्ह्यात झालेल्या अपघातात पाच पैलवानांसह सहा जण ठार झाले. तर जम्मू-काश्मीरमध्ये धुळे जिल्ह्यातील खलाणे गावचे जवान योगेश भदाणे यांना वीरमरण आले. या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपमहापौर सुनील पाटील, निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, कृष्णात पिंगळे, विनायक नरळे, डॉ. सई भोरे-पाटील,

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, र.पी.आय. (ए) पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, निवासराव साळोखे, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, महेश उरसाल, चंद्रकांत जाधव, काँग्रेसचे सुरेश कुर्‍हाडे, दगडू भास्कर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, व्यंकाप्पा भोसले, नगरसेवक अशोक जाधव, सकाळचे श्रीराम पवार, महाराष्ट्र टाइम्सचे विजय जाधव यांच्यासह विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.