Sun, Jul 21, 2019 08:04होमपेज › Kolhapur › वर्चस्वाच्या लढाईला ‘गोकुळ’चे निमित्त!

वर्चस्वाच्या लढाईला ‘गोकुळ’चे निमित्त!

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 12:51AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : रणधीर पाटील

माजी आमदार महादेवराव महाडिक व आ. सतेज पाटील यांच्यात वरवर ‘गोकुळ’ प्रश्‍नांवरून संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसत असले, तरी दोघांचीही खरी लढाई सुरू आहे ती राजकीय वर्चस्वासाठीच. दूध दर व संघातील गैरकारभारावर बोट ठेवत आ. सतेज पाटील यांनी महाडिक यांना  ‘टार्गेट’ केले आहे. ‘गोकुळ’मधील महाडिक यांच्या वर्चस्वाला हादरे दिल्यास त्यांचा जिल्ह्यातील ‘गोकुळ’ संचालकांच्या माध्यमातून असणारा पक्का राजकीय पाया खिळखिळा करण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. 

आ. पाटील यांनी ‘गोकुळ’वर मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. आता महाडिक गटानेही प्रतिमोर्चा काढून शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. त्यातून ‘गोकुळ’मध्ये सुरू झालेल्या संघर्षाच्या केंद्रस्थानी फक्त महाडिक व पाटील हेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास दूध उत्पादकांचे प्रश्‍नही बाजूलाच पडण्याची दाट शक्यता आहे.  2009 पासून सुरू आहे संघर्ष महाडिक व पाटील यांच्यात 2009 च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेल्या शह-काटशहच्या राजकारणात  कधी महाडिक यांनी पाटील यांना धोबीपछाड दिली, तर कधी पाटील यांनी महाडिक यांना अस्मान दाखवले आहे. काँग्रेस पक्षांतर्गत या दोघांच्या सुरू असलेल्या लाथाळ्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीही रोखू शकले  नव्हते. 

महाडिक यांना भाजपचे सत्ताकवच दरम्यानच्या काळात केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेसच्या ठिकाणी भाजप सत्तेवर आले. या सत्ताबदलादरम्यान जिल्ह्याच्या राजकारणानेही कूस बदलली. महादेवराव महाडिक भाजपच्या संपर्कात गेले. त्यांच्या ताकदीच्या बळावरच भाजप जिल्हा परिषदेत सत्तेपर्यंत पोहोचला. त्यात त्यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली. महाडिक यांचे जिल्हा परिषदेपासून लोकसभेपर्यंत पुन्हा एकदा  वर्चस्व निर्माण झाले. भाजपसोबत असल्याने त्यांना सत्तेचे कवचही लाभले. 

ग्रामपंचायत निवडणुकीत  काँग्रेसने केले ‘कमबॅक’ जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला मिळालेल्या यशाने आ. पाटील गटातही अस्वस्थता होती. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करीत ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील गटाने घवघवीत यश मिळवले. या यशामुळे पाटील गटाच्या कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर झाली. तेथूनच मग पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. ...अन् महाडिक यांनी  आ. पाटील यांना दिले आव्हान  विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजप व महाडिक विरोधी लाट जिवंत ठेवण्यासाठी आ. पाटील गटाने महाडिक यांचे शक्तिस्थान असलेल्या ‘गोकुळ’वरच हल्लाबोल केला. ‘गोकुळ’वर मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. महाडिक गटानेही पाटील यांना खुले आव्हान दिले. लढायचेच असेल, तर निवडणुकीचा आखाडा आहे तेथे या. ‘गोकुळ’ची  नाहक बदनामी कशाला? असे म्हणत खा. धनंजय महाडिक यांनी पाटील यांना आव्हान दिले. महाडिक गटाने पाटील यांच्या मोर्चाला प्रतिमोर्चा काढून तोडीस तोड उत्तर देण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. हा मोर्चातही ‘गोकुळ’पेक्षा महाडिक गटाचेच शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.