Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Kolhapur › गोकुळ’कडून आज निषेध मोर्चाचे आयोजन

गोकुळ’कडून आज निषेध मोर्चाचे आयोजन

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 1:41AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘गोकुळ’वर टीका करणार्‍यांचा निषेध करण्यासाठी व शासनाकडून दुधाला प्रतिलिटर तीन रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी सत्ताधार्‍यांच्या वतीने गुरुवारी दुपारी 12 वाजता दसरा चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास ‘गोकुळ’चे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, खा. धनंजय महाडिक हे मार्गदर्शन करणार आहेत. संघाचे नेते काय बोलणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘गोकुळ’ने गायीच्या दूध खरेदी दरात कपात केल्याच्या निषेधार्थ  आ. सतेज पाटील यांनी मोर्चा काढला. त्यावेळी महादेवराव महाडिकांसह संचालकांवर जोरदार टीका करण्यात आली. सत्ताधार्‍यांच्या मोर्चातही आ. सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकेची शक्यता आहे. मोर्चासाठी 1500 वाहनांची सोय केली असून अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चाच्या जागृतीसाठी संचालकांनी जिल्ह्याचा कानाकोपरा पायाखाली घालून गर्दी जमवण्यासाठी जोरात प्रयत्न केले आहेत. गावोगावी डिजिटल बोर्ड, निवेदने वाटली आहेत. शहरातील प्रमुख चौकात आ. पाटील यांच्यावर टीका करणारे डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. सकाळी साडेदहापासून दूध उत्पादक दसरा चौकात जमणार आहेत. तेथून मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय चौकात एक वाजता येणार आहे. या ठिकाणी सभेमध्ये नेते व अन्य मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ‘गोकुळ’ कर्मचारी  सभेच्या ठिकाणची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, लाऊड स्पीकर, मंडप याची तयारी करत होते.