Sun, Jul 12, 2020 16:08होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’वर घाव घालणार्‍यापासून रहा दक्ष

‘गोकुळ’वर घाव घालणार्‍यापासून रहा दक्ष

Published On: Dec 06 2017 2:00AM | Last Updated: Dec 06 2017 2:01AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पाहून गोकुळचा वटवृक्ष, करत्यात त्येला लक्ष, मुळावर घाव घालणार्‍या ‘त्या’ राजकारण्यापासून रहा तुम्ही दक्ष, असा टीकाटिप्पणी करणारा संदेश देणारी डिजिटल शहरासह जिल्ह्यात लावण्यात आली आहेत. गोकुळ दूध उत्पादकांचा गुरुवारी (दि.7) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी सत्ताधारी गटाने व विशेषत: संचालकांनी चांगलीच कंबर कसली आहे. मोर्चाच्या तयारीसाठी शहरासह जिल्ह्यात टीकाटिप्पणी असलेले डिजिटल बोर्ड, पोस्टर्सचे वाटप केले आहे. शहरातही असे भव्य डिजिटल लावण्यात आले आहे. गायीच्या दूध खरेदी दरात 2 रुपये कपात केल्याच्या निषेधार्थ आमदार सतेज पाटील यांनी गोकुळवर मोर्चा काढला. हा मोर्चा सत्ताधारी गटाला चांगलाच जिव्हारी लागला आहे. या मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या सतेज पाटील यांचा निषेध करण्यासाठी संघाने प्रतिमोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. 

येत्या गुरुवारी (दि.7) हा मोर्चा दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. मोर्चाला मोठ्या प्रमाणात दूध संस्था व नागरिकांनी उपस्थित रहावे, यासाठी गोकुळ संचालकांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या आहेत. आ. पाटील यांच्या मोर्चात संचालक व संघाच्या नेत्यांवर स्टिकर्स, कार्टुन व पोस्टरच्या माध्यमातून टीकाटिप्पणी केली होती. तशीच टीकाटिप्पणी आता निषेध मोर्चातून होण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अशी डिजिटल लावण्यात आली असून त्याची जोरदार चर्चा आहे. राजकारणातल्या  बोक्याला रोखा  आमदार सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चात संघाच्या नेत्यांचा उंट व संचालकांचे चित्रण नंदी बैल असे रेखाटण्यात आले होते. आता निषेध मोर्चासाठीही आ.सतेज पाटील यांची राजकारणातील बोका, अशा प्रकारचे चित्रण करण्यात आले आहे. गोकुळ दूध संघाला बदनाम करणार्‍या राजकारण्यातल्या बोक्याला रोखा, असे आवाहन या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आले  आहे.

‘गोकुळ’ मोर्चा नियोजनावरून संचालक-कर्मचार्‍यांत मतभेद

‘गोकुळ’कडून गुरुवारी (दि.7) काढण्यात येणार्‍या निषेध मोर्चाच्या नियोजनावरून संचालक-कर्मचार्‍यांत मतभेद असल्याची चर्चा आहे. मंगळवारी (दि.5) याबाबत झालेल्या बैठकीत हे मतभेद उघड झाले. आम्हाला गोकुळ संस्थेत इंटरेस्ट आहे तुमच्या राजकारणात नाही, असे कर्मचार्‍यांनी संचालकांना सुनावले असल्याचे बोलले जात आहे. गायीच्या दूध खरेदी दरात कपात केल्याने गोकुळमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष सुरू झाला आहे. संघाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी मोर्चा काढला. संघाचे संचालक नंदीबैलासारखे नेत्यांसमोर माना डोलवतात. संघाचे नेते व संचालक गोकुळमध्ये भ्रष्ट कारभार करत असल्याचा आरोप अनेक वक्त्यांनी या मोर्चात केला होता.

आता गोकुळमधील सत्ताधार्‍यांनीही निषेध मोर्चाचे नियोजन केले आहे. या मोर्चासाठी सर्व तालुक्यांत बैठका घेण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांना जमवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या निषेध मोर्चाचे नियोजन कर्मचारी संघटनांनी करावे, अशी मागणी संचालकांनी केली होती. मात्र, काही कर्मचार्‍यांनी यास नकार दिला. मोर्चाच्या माध्यमातून सुरू असलेल्या राजकारणात आपणाला इंटरेस्ट नसल्याचे या कर्मचार्‍यांनी संचालकांना सुनावले असल्याचे बोलले जात आहे. गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण तुमच्या राजकारणात काही रस नसल्याचे या कर्मचार्‍यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या या बैठकीत बरीच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकीय हेतूने प्रेरित ‘गोकुळ’वरील टीका चुकीची