Tue, Apr 23, 2019 00:29होमपेज › Kolhapur › हिताचा कारभार करता, मग दारोदारी का फिरता?

हिताचा कारभार करता, मग दारोदारी का फिरता?

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:43AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

संघाच्या हिताचा कारभार करत असल्याचा डांगोरा पिटणार्‍या ‘गोकुळ’ संचालकांना गावोगावी का फिरावे लागत आहे, असा प्रश्‍न विरोधी गटाने संचालकांना विचारला आहे. किमान निषेध मोर्चासाठी तरी संघाच्या स्कॉर्पिओ वापरू नका, असे आवाहन बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब देवकर, किशोर पाटील, किरणसिंह पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

‘गोकुळ’ने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रुपये कपात केली आहे. याविरोधात आ. सतेज पाटील यांनी मोर्चा काढला. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून दूध उत्पादक मोर्चासाठी उपस्थित राहिले. त्यामुळेच सत्तारूढ संचालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी 7 डिसेंबरला  मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला लोक येतील का, असा प्रश्‍न  असल्याने संघाचे संचालक गावोगावी फिरून  मोर्चात येण्याचे आवाहन करत आहेत. या सर्व उद्योगासाठी ‘गोकुळ’च्या स्कॉर्पिओ वापरल्या जात आहेत. किमान निषेध मोर्चासाठी तरी संचालकांनी स्वत:ची वाहने वापरण्याचे कष्ट घ्यावे, असा टोमणा विरोधकांनी मारला आहे.

संचालकांकडून सुरू असलेल्या निषेध मोर्चा बैठकीत आ. सतेज पाटील यांच्यावर टीका करण्यात येत आहे. संचालकांनी ही टीका करण्यापेक्षा संघासाठी, दूध उत्पादकासाठी काय केले ते सांगावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संघाचा कारभार चोख असेल तर लोक मोर्चाला येतील; पण संघातील कारभाराची दूध उत्पादकाला माहिती असल्याने बहुतांश दूध उत्पादक या मोर्चापासून दोन हात दूर आहेत. पन्हाळा-बावडा येथील अनेक दूध उत्पादकांनी  मोर्चात आपण सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. यावरूनच संघाच्या कारभाराची प्रचिती येत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.