Fri, Feb 22, 2019 00:14होमपेज › Kolhapur › गोवा बनावटीची दारू जप्त

गोवा बनावटीची दारू जप्त

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 11:08PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चंदगडसह आजरा तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून  10 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. ही दारू नामवंत ब्रँडच्या नावाने विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. गवसे, नागणवाडी व करंजगाव येथे ही कारवाई झाली.  याप्रकरणी आप्पा विठोबा भोसले (वय 50, हिंडगाव), लक्ष्मण सखोबा गावडे (48, रा. नागणवाडी), शंकर राणबा दळवी (46, रा. करंजगाव) या तिघांना अटक झाली. 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. गोवा, कर्नाटक सीमेवर पथकांकडून वाहनांची तपासणी सुरू आहे. चंदगडसह आजरा तालुक्यात गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात आणण्यात आल्याची माहिती विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांना मिळाली. 

शनिवारी भरारी पथकाने गवसे गावी छापा टाकून आप्पा भोसले याच्या ताब्यातील 10 लाख 45 हजार रुपये किमतीचे 215 बॉक्स जप्त केले. तसेच नागणवाडी व करंजगाव येथे छापे टाकून 168 बाटल्या जप्त केल्या. कारवाईमध्ये एकूण 10 लाख 62 हजारांची दारू जप्त करण्यात आली. कारवाईमध्ये निरीक्षक युवराज शिंदे, एस. एम. परळे, एस. एम. वाडेकर, जी. पी. थोरा, कृष्णात पाटील, सुशांत बनछोडे, अमित तांबट, सुहास वरुटे, अर्जुन कोरवी, मोहन पाटील, विक्रम परळीकर, संतोष बिराजदार, श्रीपाद पाटील यांनी सहभाग घेतला.