Sat, Aug 24, 2019 19:50होमपेज › Kolhapur › गोवा बनावटीची 6 लाखांची दारू पकडली

गोवा बनावटीची 6 लाखांची दारू पकडली

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 11:12PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

गोवा बनावटाची विदेशी दारू राजरोसपणे रस्त्यावर उभा राहून विक्री करणार्‍या युवकास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने रंगेहाथ पकडले. अर्जुन राजेंद्र साळोखे (वय 22, रा. 1174 ए वॉर्ड, सरदार तालीम, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून गोवा बनावटीची 6 लाख 20 हजार रुपये किमतीची दारू आणि मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारा टेम्पो असा 8 लाख 21 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

कार, टेम्पोमध्ये दारूचे बॉक्स ठेवून गोवा बनावटीची दारूविक्री करणारी टोळी कोल्हापुरात सक्रिय असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. या टोळीला पकडण्यासाठी एक्साईजच्या पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. यानुसार उपायुक्त संगीता दरेकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक एम. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभागातील पोलिस पथकाने रविवारी रात्री देवकर पाणंद परिसरात सापळा रचला होता. पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर एक तरुण ग्राहकांच्या मागणीनुसार गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या व बॉक्स देत असल्याचे पथकातील अधिकार्‍यांना निदर्शनास आले.

त्यानंतर पथकाने अर्जुन साळोखेला दारूविक्री करत असताना रंगेहाथ पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याने देवकर पाणंद परिसरात एका ठिकाणी गोवा बनावटीचे विदेशी 40 पेक्षा अधिक बॉक्स ठेवले होते. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला आहे. तसेच टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. कारवाईत निरीक्षक युवराज शिंदे, दुय्यम निरीक्षक एस. एम. वाडेकर, एस. एम. परळे, कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, अमित तांबट, सुहास वरुटे, सुशांत बनसोडे, अनिल यादव यांनी सहभाग  घेतला.