Tue, Sep 17, 2019 22:00होमपेज › Kolhapur › गुंडांच्या बेहिशेबी मालमत्तांवर टाच आणणार : नांगरे-पाटील

गुंडांच्या बेहिशेबी मालमत्तांवर टाच आणणार : नांगरे-पाटील

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 27 2017 1:30AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

 खंडणीसह गैरमार्गाने बेहिशेबी मालमत्ता कमाविलेल्या परिक्षेत्रांतर्गत 38 नामचिन टोळ्यांचे म्होरके, साथीदारांमागे पोलिस-महसूल यंत्रणेकडून चौकशीचा ससेमिरा लागला  आहे. दहशतीच्या बळावर कमाविलेल्या मालमत्तांवर टाच आणून त्यावर सरकारी कब्जा करण्याची नव्याने प्रक्रिया सुरू झाली आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
या कारवाईमुळे खासगी सावकारांसह संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून होणार्‍या आर्थिक पिळवणुकीच्या घटनांना आळा बसेल. कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) व सावकारी कायद्याचा बडगा उगारण्यात आलेल्या 38 टोळ्यांचे म्होरके व त्यांचे साथीदार ‘रडार’वर आहेत. त्यात कोल्हापूर व सांगलीतील सहा टोळ्यांतील सराईतांच्या मालमत्तांचा शोध सुरू आहे, असेही विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले.

आर्थिक पिळवणुकीसह संघटित टोळ्यांच्या उच्चाटनासाठी राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष करून दहशतीच्या बळावर खंडणी वसुली व अन्य मार्गाने लूटमार करणार्‍या टोळ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यासाठी परिक्षेत्रांतर्गत अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.  त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले. वाहतूक यंत्रणा अधिक मजबूत करणार कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रांतर्गत वाहतुकीचा विषय गंभीर आहे. वाहतूक यंत्रणेत सुसूत्रता निर्माण करण्यासाठी ट्रॅफिक मॅनेजमेंट राबविण्यात येेत आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यावर भर आहे. सातारा, पुणे जिल्ह्यांत ही यंत्रणा अधिक सुलभ करण्यावर प्राधान्याने भर देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात ‘ड्रंक अँड ड्रॉईव्ह’ विरोधी मोहीम थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात ‘ड्रंक अँड ड्रॉईव्ह’विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत कारवाईची व्यापकता दिसून येईल, असेही विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले.

विश्वास नांगरे-पाटलांच्या बदलीची अफवाच!