होमपेज › Kolhapur › गुर्‍हाळात ‘जुगाराचे गाळप’

गुर्‍हाळात ‘जुगाराचे गाळप’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

वडणगेनजीक असलेल्या एका गुर्‍हाळघराच्या शेडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून जुगारअड्डा सुरू आहे. या अड्ड्यावर दररोज किमान सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल होत असून, या जुगाराच्या नादात अनेक जुगार्‍यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.

एक स्थानिक आणि कोल्हापुरातील एका ‘भांडवलदारा’ने भागीदारीमध्ये हा अड्डा चालू केला आहे. या अड्ड्यावर जुगाराचे डाव रंगतात. प्रामुख्याने तरुणवर्ग आणि दोन नंबरवाल्यांचा या ठिकाणी राबता पाहायला मिळतो. जुगार खेळणार्‍यांना अनेक प्रकारच्या ‘सोयीसुविधा’ पुरविण्यात येतात. एकदा बैठक बसली आणि डावावर डाव रंगात आले की, कधी-कधी तर दोन-दोन दिवस इथली ‘बैठक’ मोडत नाही. 

या जुगारअड्ड्यात आजपर्यंत शेकडोजणांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करून घेतली आहे, अनेकांचे होत्याचे नव्हते झाले आहे आणि त्या पटीत या अड्डाचालकांचे ‘कोटकल्याण’ झालेले आहे.या जुगारअड्ड्याचा आणि तिथे चालणार्‍या उचापतींचा अनेकवेळा स्थानिक लोकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, या अड्ड्याची चालक मंडळी बडी आसामी आणि टगेबाज असल्यामुळे त्यांच्या नादाला लागायचे धाडस कोणी करीत नाही. स्थानिक पोलिसांना या जुगारअड्ड्याची ‘महती’ माहीत नसेल, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मात्र, आजपर्यंत तरी पोलिसांकडून या जुगारअड्ड्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.