Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-गगनबावडा मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

कोल्हापूर-गगनबावडा मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:49AMकोल्हापूर : सुनील सकटे

कोल्हापूर-गगनबावडा या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करून केंद्र सरकारने या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले आहे. हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग बनल्याने कोकणात जाण्यासाठी आणखी एक महामार्ग उपलब्ध झाला आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी या राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वत: मान्यता दिली होती. तत्त्वत: मान्यतेनंतर वर्षभरातच केेंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. या राष्ट्रीय महामार्गास आता 166-जी हा क्रमांक देण्यात आला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ते पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग असा 53 कि. मी. राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166-जी या नावाने ओळखला जाणार आहे. नवीन राष्ट्रीय महामार्गाची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेरेपासून सुरुवात होणार आहे. तळेरे-वैभववाडी-कोल्हापूर असा हा राष्ट्रीय महामार्ग असून पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गास जोडण्यात येणार आहे. दोन राष्ट्रीय महामार्ग जोडण्याच्या संकल्पनेतून हा महामार्ग बनविण्यात आला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाबरोबरच आता कोल्हापूर-गगनबावडा हा आणखी एक महामार्ग वाहनधारकांसाठी उपलब्ध झाला आहे.

या महामार्गामुळे कोकणातील आंबा आणि इतर शेतीउत्पादने कोल्हापूरसह कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी भागात वाहतुकीसाठी चांगली सोय झाली आहे. तर कोल्हापुरातील उत्पादने कोकणात वाहतूक करण्याचीही सोय झाली आहे. हा रस्ता महामार्ग बनल्याने या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाची कामे गतीने होणार आहेत. तसेच थेट केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भविष्यात या महामार्गाचे चौपदरीकरण करून वाहतूक अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न होणार आहे.