Thu, Jul 18, 2019 02:09होमपेज › Kolhapur › आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी चार शाळांची शिफारस

आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी चार शाळांची शिफारस

Published On: Dec 19 2017 1:59AM | Last Updated: Dec 18 2017 11:14PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रवीण मस्के

ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विद्या प्राधिकरणास जिल्ह्यातून चार शाळांच्या शिफारसींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आंतरराष्ट्रीय शिक्षण मिळणार असल्याने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा अधिक उंचावणार आहे.

राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळांची निर्मिती करण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा पार पडला असून ‘ओजस’ व ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. विद्या प्राधिकरणामार्फत शाळा निर्मितीसाठी अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर लिंक देण्यात आली होती. जिल्ह्यातून 12 शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. 

 जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, ‘डाएट’ प्राचार्य या समितीने या शाळांचे फेरमूल्यांकन करून चार शाळांची नामांकने केली आहेत. या शाळांचे प्रस्ताव विद्या प्राधिकरण प्रादेशिक विभागाला सादर करण्यात आले आहेत. कोणत्या शाळांची निवड होणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.