Thu, Jan 17, 2019 20:28होमपेज › Kolhapur › वनरक्षकांचा बहिष्कार; व्याघ्र गणना रखडणार ?

वनरक्षकांचा बहिष्कार; व्याघ्र गणना रखडणार ?

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 1:03AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : डी. बी. चव्हाण

वनरक्षक आणि वनपाल या पदांना शासनाने तांत्रिक पदांचा दर्जा नाकारला आहे. यामुळे या संघटनांनी वन विभागातील तांत्रिक कामे करण्यावर बहिष्कार घातला आहे. बहिष्कार घालून तीन महिने होत आहेत. यावर शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या महिन्यात होणार्‍या व्याघ्र गणनेवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असून, वन्यप्राण्यांची अचूक माहिती नोंदविण्यामध्ये मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

शासनाच्या वतीने दरवर्षी 20 ते 25 जानेवारी या कालावधीत व्याघ्र गणना केली जाते. पूर्वी वाघांसह वनातील अन्य प्राण्यांची गणना करत असताना प्राण्यांच्या पायांचे ठसे, विष्ठा याचे नमुने घेतले जात असत; पण ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने व्याघ्र व वन्य प्राणी गणनेसाठी आधुनिक प्रणालीचा वापर केला जात आहे. संगणकावरील जीपीएस प्रणालीद्वारे प्राण्याचे लोकेशन तपासणे, मार्ग तपासणी, फोटो घेणे आदी कामे ही गूगलवरून केली जातात. वन विभागातील प्रत्येक भागाची माहिती घेऊन ती एकत्रित केली जाते. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून तो राज्य आणि केंद्र शासनांकडे पाठविण्यात येतो. ही सर्व कामे वनरक्षक आणि वनपाल यांच्याकडून केली जात होती. राज्यात हा कार्यक्रम राबवला जातो.

पण, ही कामे करणारे वनपाल आणि वनरक्षक यांनी आपल्याला तांत्रिक कर्मचारी ठरवून वेतन द्या, अशी मागणी शासनाकडे केली होती; पण शासनाने ही दोन्ही पदे तांत्रिक नसल्याचा आदेश काढला आहे. यामुळे वनपाल आणि वनरक्षकांनी संगणकावर माहिती संकलित करण्यासह तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे गेली तीन ते चार महिने हे काम ठप्प आहे. कोल्हापूर वनवृत्त विभागाकडे पाच जिल्हे आहेत. पाच जिल्ह्यांत चांदोली, दाजीपूर ही दोन अभयारण्ये आणि इतर जंगलाचा भाग आहे. या मोहिमेतील तांत्रिक काम हे वनपाल आणि वनरक्षक करत असतात; पण शासनानेच त्यांची अतांत्रिक अशी गणना गेली आहे. त्यामुळे त्यांनी तांत्रिक कामांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम व्याघ्र गणनेवर होण्याची शक्यता आहे. पाच जिल्ह्यात वनपाल व वनरक्षकांची संख्या 700 आहे.