Thu, Jul 18, 2019 00:03होमपेज › Kolhapur › चार महिला कर्मचारी निलंबित

चार महिला कर्मचारी निलंबित

Published On: Dec 19 2017 1:59AM | Last Updated: Dec 18 2017 11:40PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सीपीआरमधील प्रसूतीशास्त्र विभागात रुग्णांकडून पैशांची मागणी करणार्‍या चार महिलांना सोमवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी निलंबित केले. अन्य एका महिला कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. या विभागातील मुकादमाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या कारवाईने कर्मचार्‍यांत खळबळ उडाली आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

सीपीआरच्या प्रसूतीशास्त्र विभागात दाखल होणार्‍या रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सर्रास सुरू होता. कधी बक्षीस म्हणून, तर कधी देणगीच्या स्वरूपात रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे वसूल केले जात होते. बक्षीस, देणगी नसेल तर प्रसूतीगृहात प्रसूतीदरम्यानची कपडे धुतल्याचे कारण सांगत पैशांची मागणी केली जात होती. विशेष म्हणजे, याकरिता दरच निश्‍चित करण्यात आले होते. पैसे नसतील तर विविध वस्तूंचीही मागणी केली जात होती.

या सर्व तक्रारींची सीपीआर प्रशासनाला माहिती होती. वारंवार सूचना देऊन कामात सुधारणा करण्याबाबत कर्मचार्‍यांना सांगण्यात येत होते. मात्र, लेखी स्वरूपात तक्रार नसल्याने प्रशासकीय कारवाईला मर्यादा येत होत्या. सीपीआरच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात महिला कर्मचारी रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैशांची मागणी करत असल्याची तक्रार अ‍ॅड. सरदार प्रताप खाडे यांनी दि. 22 ऑक्टोबर रोजी, तर प्रवीण पांडुरंग गणाचारी (रा. किणी, ता. चंदगड) यांनी दि. 3 नोव्हेंबर रोजी दाखल केली. दरम्यान, खाडे यांच्या तक्रारीवर अधिष्ठातांनी दि. 2 नोव्हेंबर रोजी चौकशी समिती स्थापन केली होती. तक्रारदारांनी समितीसमोर पैसे मागत असल्याचे पुरावे सादर केले.

समितीने दि. 13 रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालात प्रसूती विभागातील पाच महिला कर्मचारी दोषी ठरवण्यात आले. चौकशी समितीत दोषी आढळून आलेल्या पाच महिला कर्मचार्‍यांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील चार महिला कर्मचार्‍यांना डॉ. रामानंद यांनी आज निलंबित केले. एक महिला कर्मचारी सिव्हिल सर्जन यांच्या आस्थापनेवरील असल्याने संबंधित महिला कर्मचार्‍याला निलंबित करण्याबाबतचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहे. संबंधित महिलेवरही दोन दिवसात निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रसूती विभागातील कर्मचार्‍यांच्या मुकादमालाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.