Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Kolhapur › पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी आता मिथेनॉल

पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी आता मिथेनॉल

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 1:16AM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः राजेंद्र जोशी

इंधनाच्या आयातीवरील परकीय चलनामध्ये कपात करणे आणि स्वदेशी अपारंपरिक ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम योग्य दिशेने मार्गी लागल्यानंतर देशात आता मिथेनॉलचे पर्व सुरू होते आहे. नव्या वर्षारंभी पेट्रोलमधील मिथेनॉल मिश्रणाचा नवा कार्यक्रम सुरू करण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये नीती आयोगामार्फत एक कृती आराखडा निश्‍चित करण्यात येत असून नव्या वर्षारंभी या कार्यक्रमाला प्रारंभ करण्याचे नियोजन आहे. या कार्यक्रमाद्वारे भारताचे इंधनाच्या आयातीचे अवलंबित्व 30 टक्क्याने कमी होऊ शकेल, असा विश्‍वास नीती आयोगाने व्यक्त केला आहे.

भारतामध्ये प्रतिवर्षी सरासरी 20 हजार कोटी लिटर्स इतकी क्रूड ऑईलची आयात केली जाते. या आयातीपोटी भारताला सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांचे परकीय चलन खर्ची टाकावे लागते. यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात खर्चाच्या बाजूला मोठे शीर्षक बनून राहिलेल्या या परकीय चलनामध्ये कपात करावी, इंधनाच्या बाबतीत विदेशी अवलंबित्व कमी व्हावे आणि स्वदेशी पर्यायी इंधनाचा विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये इथेनॉल व डिझेलमध्ये बायोडिझेल मिश्रणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत साखर उद्योगातील मळीपासून निर्माण होणार्‍या इथेनॉलला प्राधान्यक्रम देण्यात आला होता. या इथेनॉलमुळे साखर उद्योगाला मोठा आर्थिक हातभार लागत असल्याने केंद्राने पेट्रोलमधील 10 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट निश्‍चित केले.

त्यासाठी चांगला आधारभूत दरही जाहीर करण्यात आला. यामुळे यंदा देशात मिश्रणासाठी 155 कोटी लिटर्स इथेनॉल उपलब्ध झाले आहे. या उपलब्धतेने मिश्रणाचे प्रमाण पाच  टक्क्यांच्या पुढे सरकते आहे. तथापि, औद्योगिक अल्कोहोल, मद्यार्क निर्मिती व अन्य उत्पादनांच्या निर्मितीमुळे इथेनॉल उपलब्धतेला असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन केंद्राने आपला मोर्चा मिथेनॉल निर्मितीकडे वळविला असून यापुढे हे दोन कार्यक्रम स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहेत.

पेट्रोलला पर्यायी इंधन म्हणून उभे राहात असलेल्या मिथेनॉलची निर्मिती कोळसा आणि अन्य रसायन व खत उद्योगातून होते. भारतात या निर्मितीला मोठा वाव आहे. विदर्भातील विदर्भ, झारखंड, आंध्र आदी कोळशाच्या खाणपट्ट्यातून हे मिथेनॉल जसे उपलब्ध होईल, तसे मुंबई सभोवतालच्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स, दीपक फर्टिलायझर्स यांच्याकडूनही मिथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्याचा निर्मिती खर्च इथेनॉलपेक्षा कमी म्हणजे सरासरी 22 रुपये प्रतिलिटर इतका आहे. कोळसा उत्पादनातील उपपदार्थ म्हणून ओळखले जाणारे मिथेनॉल चीनमध्ये 17 रुपये प्रतिलिटर या दराने उपलब्ध होते. या दराचा विचार करता मिथेनॉलचा वापर पेट्रोलच्या मिश्रणासाठी सुरू झाला, तर देशातील इंधनाचे दर खाली येतील, परकीय चलनात मोठी बचत होईल. शिवाय, अवलंबित्व 30 टक्क्यांनी कमी होईल, असा विश्‍वास नीती आयोगाने व्यक्त केला आहे.