Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Kolhapur › पुण्यातील अपघातात कोल्हापूरचा अभियंता ठार

पुण्यातील अपघातात कोल्हापूरचा अभियंता ठार

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पुण्यातील नवले ब्रीजवर दुचाकी दुभाजकावर आदळून कोल्हापूरचा युवा अभियंता निकेत राजेंद्र पाटील (वय 22, रा. जैन बस्ती, गुजरी) याचा मृत्यू झाला. कात्रज येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून तो नोकरीस होता. काम संपवून तो रूमकडे जात असताना अपघात झाला. रविवारी रात्री त्याचा मृतदेह कोल्हापुरातील घरी आणण्यात आला.

अधिक माहिती अशी, निकेत पाटील याने भारती विद्यापीठातून संगणक अभियंता पदवी मिळविली. यानंतर तो वर्षभरापासून पुण्यात नोकरीस होता. कात्रज परिसरात मित्रांसोबत रूम भाड्याने घेऊन तो राहत होता. निकेतचे वडील शेती करतात.

वडील, आई व बहीण असे तिघे गुजरीत राहण्यास आहेत.  शनिवारी रात्री 8 ते पहाटे 4 च्या ड्युटीसाठी तो गेला. ड्युटी संपवून पहाटे रूमकडे येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकावर आदळला. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी सरकारी इस्पितळात नेण्यात आले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रविवारी सकाळी याची माहिती पाटील कुटुंबीयांना मिळाली. नातेवाईकांनी रुग्णालयात जावून मृतदेह ताब्यात घेतला. रात्री आठच्या सुमारास मृतदेह कोल्हापुरात आणण्यात आले. रात्री पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या मृत्यूचा पाटील कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.