Sun, Oct 20, 2019 12:01होमपेज › Kolhapur › जिल्हा मुख्याध्यापक संघात परिवर्तन

जिल्हा मुख्याध्यापक संघात परिवर्तन

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 1:23AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

चुरशीने झालेल्या कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत मतदारांनी दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. 25 पैकी 22 जागांवर विजय मिळवीत सत्ताधारी छत्रपती शाहू सत्तारूढ पॅनेलचा धुव्वा उडविला आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 73 वर्षांपासून सत्ता असलेल्या मुख्याध्यापक संघात पहिल्यांदाच सत्ता परिवर्तन झाले आहे.

जिल्हा मुख्याध्यापक संघाची त्रैवार्षिक निवडणूक दीड वर्ष उशिराने लागली.  सत्ताधार्‍यांना शह देण्यासाठी विरोधकांनी सर्वांना एकत्रित करून मोट बांधली. प्रचाराचा धुरळा उडल्यानंतर रविवारी (दि.24) सकाळी 8 वाजता मतदानास सुरुवात झाली. मुख्याध्यापक संघाच्या परिसरात दोन्ही गटांनी मतदान बूथ उभारून मतदारांचे स्वागत केले. उमेदवारांसह मतदारांनी डोक्यावर आपापल्या गटाच्या टोप्या घालून लक्ष वेधून घेतले. दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे 60 टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजता 710 पैकी 697 मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 98.16  राहिली. 

सायंकाळी पाच वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सहाच्या सुमारास मतमोजणी केंद्रावरून जसजसा कार्यकर्त्यांना निकाल समजू लागला, तसा उत्साह वाढत गेला. विरोधी गटाच्या राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल्लोषास सुरुवात केला. सुरुवातीपासूनच विरोधी गट आघाडीवर  राहिला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. साडेआठ वाजता निकालाचे चित्र स्पष्ट झाले. विरोधी आघाडीने 23 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीत ब्लँक मतपत्रिका व 19 पेक्षा जास्त मते दिल्याने 25 मते अवैध ठरली.