Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Kolhapur › गुणवत्तावाढीसाठी शिक्षण वारी

गुणवत्तावाढीसाठी शिक्षण वारी

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 12:18AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रवीण मस्के

शिक्षकांनी तयार केलेले नवनवीन संशोधनात्मक प्रयोग ‘शिक्षण वारी’च्या माध्यमातून शिक्षकांना पाहता व समजून घेता येणार आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तावाढीबरोबरच शिक्षकांमधील प्रयोगशीलतेला वाव मिळणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत 2015-16 पासून आगळे-वेगळे प्रयोग केले जात आहेत. शैक्षणिक प्रयोग शिक्षकांपर्यंत पोहोचावेत व शैक्षणिक गुणवत्ता विकास होण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून ‘शिक्षणाची वारी’ हा उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी 2018 मध्ये ‘शिक्षण वारी’ कार्यक्रम होणार आहे. वारीमध्ये गणित, भाषा वाचन विकास, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका, मूल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण अशा प्रकारच्या उपक्रमांचा समावेश असणार आहे. शिक्षण वारीमध्ये लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्टॉलवर राज्याच्या कानाकोपर्‍यांतील शिक्षकांनी तयार केलेले साहित्य प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. शिक्षकांनी हे प्रयोग जाणून, समजून घेऊन आपल्या शाळेत कसे राबविता येतील, याचे प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमाचा दैनंदिन अध्यापन प्रभावी होण्यासाठी उपयोग होणार आहे.