होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कुत्री उठली नागरिकांच्या जीवावर

कोल्हापूर : कुत्री उठली नागरिकांच्या जीवावर

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 1:38AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : एकनाथ नाईक 

जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यातील 22,720, तर शहरातील 6,224 जणांचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. 25 हजारांहून अधिक भटकी कुत्री असावीत असा अंदाज असून, जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची गणनाच करणे अशक्य आहे. शहरात 3,500 पाळीव कुत्री आहेत. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी असलेले कायद्याचे संरक्षण आणि महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती, यामुळे शहरात दरवर्षी मोकाट कुत्र्यांच्या संख्येत हजारोने वाढ होत आहे. 

जिल्ह्यातील कळे, बाजार भोगाव, कोडोली, साळवण, बांबवडे, सांगरूळ, कागल, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, राधानगरी, कोवाड, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, वडगाव, उचगाव, इचलकरंजी आदीसह कागल, शिरोली औद्योगिक वसाहत येथे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. तर शहरातील गल्ली-बोळांत भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.नागरिकांना रात्री सोडाच, दिवसा रस्त्यावरून फिरणे अवघड झाले आहे. शहरातील मटण मार्केट, खाऊ गल्ली, सायबर चौक, सीपीआर, रंकाळा पदपथ, सानेगुरुजी, संभाजीनगर, मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट यार्ड, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, बोंद्रेनगर, विक्रमनगर, मोरेवाडी, कदमवाडी, गांधीनगर, सांगली फाटा येथे विविध प्रकारच्या टपर्‍या आहेत. येथे ही भटकी कुत्री मोठ्या संख्येने दिसून येतात. रात्री नागरिक व प्रवाशांवर ही कुत्री चाल करतात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा पाठलागदेखील करतात. 

प्राणिमित्र संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, 32 माणसांमागे एक कुत्रा आहे. शहराची लोकसंख्या साडेपाच लाख आहे. या आधारे शहरात 17 हजार 187 पेक्षा अधिक भटकी कुत्री आहेत. यामध्ये महिन्याला वाढ होत आहे हे गृहीत धरून महापालिकेने निर्बीजीकरणाचे नियोजन केले पाहिजे; पण आर्थिक परिस्थितीअभावी महापालिका कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात अपयशी ठरली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व निर्बीजीकरण कायदा 2011 च्या कडक निर्देशांनुसार मोकाट, भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा, याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने पाच वर्षांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली होती. तेव्हा साडेचार हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती. पैशांच्या कारणास्तव ही मोहीम बंद करण्यात आली आहे. परिणामी, आटोक्यात आलेली भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे.