Thu, Mar 21, 2019 11:38होमपेज › Kolhapur › सावधान... कुत्र्याचा चावा ठरतोय जीवघेणा

सावधान... कुत्र्याचा चावा ठरतोय जीवघेणा

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 11:05PMकोल्हापूर : प्रतिनिधी

आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास 29 हजार नागरिकांचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. रेबीज लस वेळेत घेतली नसल्याने महिन्याभरात दोघांचा, तर गतसाली शहरातील चौघांचा रेबीजमुळे जीव गेला आहे. जानेवारीमध्ये तब्बल 750 जणांना श्‍वानदंश झाला असून, तीनजणांना मृत्यू झाला आहे. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या चार दिवसांपासून रेबीजची लस टोचून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.

दररोज 50 ते 60 रुग्ण ही लस टोचून घेण्यासाठी येत आहेत. रेबीज हा आजार फक्त कुत्र्यापासून होतो, असा नागरिकांचा समज आहे; पण कुत्र्याबरोबरच माकड, मांजर, वटवाघूळ, कोल्हा, जंगली मांजर यांच्या दंशातून किंवा लाळेच्या संपर्कात आल्याने होतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागररिकांनी सावध राहणे गरजचे आहे. रेबीज झालेला प्राणी पाणी, वारे याला अधिक घाबरतो. त्यामुळे या आजारास ‘जलसंत्रास’ असेही म्हणतात. 90 ते 175 दिवसांमध्ये त्याची लक्षणे दिसू लागतात. एखाद्या कुत्र्याला रेबीज झाल्यास तो दिसेल त्याचे लचके तोडतो. तसेच आठ ते दहा दिवसांत त्याचा मृत्यू होतो.

त्यामुळे नागरिकांनी कुत्रा चावल्याबरोबर त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. त्यामुळे शरीरात या आजाराचा संसर्ग होत नाही. इतकी जनजागृती होऊनही नागरिक याकडे कानाडोळा करतात. कुत्र्याचा एक चावा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कुत्रा असो किंवा मांजर यांच्या चाव्याकडे दुर्लक्ष करू नये, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी आवाहन केले अहे.