Fri, May 29, 2020 01:52होमपेज › Kolhapur › बायोमट्रिक रेशनिंगमध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वल

बायोमट्रिक रेशनिंगमध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वल

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:26AMवडणगे : वार्ताहर

रेशन धान्य दुकानात आधार पडताळणी अनिवार्य ठरणार असलेल्या ए.ई.पी.डी.एस. (आधार इनेबल्ड पब्लीक डिस्ट्रिब्युशन सिस्टिम) या नवीन सुरू करण्यात आलेल्या प्रणालीत कोल्हापूर जिल्हा नंबर वन ठरला आहे. 

5 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या नव्या प्रणालीत मंगळवार (दि.20) अखेर जिल्ह्यातील एकूण 5 लाख 68 हजार 828 रेशन कार्ड पैकी 3 लाख 96 हजार 401 इतक्या कार्डांचे ट्रान्झक्शन पूर्ण झाले आहे. या नव्या प्रणालीत राज्यात आतापर्यंत झालेल्या एकूण 1 कोटी किलो ग्रॅम धान्य वाटपात कोल्हापूर जिल्ह्याचा वाटा हा निम्मा आहे. या नवीन प्रणालीत जिल्हा अव्वल ठरला आहे.

या नवीन बायोमेट्रिक सिस्टिममध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा तिसर्‍या टप्प्यात समावेश होऊनही अवघ्या पंधरा दिवसांत जिल्ह्याने बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये 69 टक्यांचा टप्पा ओलांडला आहे. तर याच प्रणालीत पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात समावेश झालेल्या भंडारा (67 टक्के), वाशिम (57 टक्के), आणि नागपूर (53 टक्के) या जिल्ह्यांना मागे टाकून कोल्हापूर आघाडीवर राहिला आहे.

रेशनिंग मधील काळाबाजार रोखण्यासाठी एप्रिल 2017 मध्ये शासनाने राज्यातील 52 हजार रेशन धान्य दुकानात बायोमेट्रिक सिस्टिम सुरू केली. यानुसार जिल्ह्यातील 1572 रेशन धान्य दुकानदारांकडून प्रत्येक शिधापत्रिकाधारकाचे नाव, कुटुंबातील सदस्यांची संख्या, आधार नंबर खाते नंबर आदी माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर कुटुंबातील प्रमुख महिला सदस्यांच्या नावावर सर्व रेशन कार्ड करण्यात आली. आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार नंबरही या कार्डला जोडण्यात आले. ई-पॉज मशीनवर रेशन कार्ड लाभार्थ्यांचा अंगठा ठेवून त्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी करून धान्य वितरण करण्यात येते. मात्र, सुरुवातीच्या या प्रणालीत चुकीच्या नंबरमुळे आधार पडताळणी न होणे, अंगठा न जुळणे, कार्डला आधार लिंक नसणे, सर्व्हरची अडचण, डाटा पिकअप करताना राहिलेल्या त्रुटी या सारख्या अडचणींचा सामना करावा लागला. नवीन प्रणालीत कोल्हापूर जिल्ह्याचा 5 फेब्रुवारीला समावेश झाला आहे. पूर्वीच्या सिस्टिममध्ये ई-पॉज मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर आधार पडताळणी झाली नाही तरी मशीनमधून रेशनिंगची पावती निघत होती. मात्र, आताच्या या नव्या प्रणालीमध्ये एखाद्या लाभार्थ्याची काही त्रुटींमुळे आधार पडताळणी झाली नाही तर मशीन मधून पावती निघणार नाही. यात त्या कार्डधारकाची काय त्रुटी राहिली आहे, याची ऑनलाईन नोंद होणार आहे.

ए.ई.पी.डी.एस. ही बायोमेट्रिक प्रणाली किचकट स्वरूपाची आहे, असा सुरुवातीला काही भागात समज होता. मात्र, 5 फेब्रुवारीला ही सिस्टिम सुरू झाल्यापासून आजरा (86 टक्के), पन्हाळा (74 टक्के), गगनबावडा (72 टक्के), भुदरगड (71 टक्के), शाहूवाडी (66 टक्के) या दुर्गम व डोंगराळ तालुक्यांनी चांगली आघाडी घेतली आहे. यात कागल व करवीरचा वाटा अनुक्रमे 76 व 68 टक्के इतका आहे.