Sat, Apr 20, 2019 10:08होमपेज › Kolhapur › मस्टरवर शिक्षिकेच्या बनावट सह्या

मस्टरवर शिक्षिकेच्या बनावट सह्या

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 10:13PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील अत्युच्च अशा राष्ट्रपती पुरस्काराने गौरवलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकानेच खोटेपणाचा आधार घेऊन जि.प.ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वत: 181 दिवसांपेक्षा केवळ 70 दिवस शाळेत हजेरी लावली असून, त्यातही 35 दिवस कॉम्प्युटरवरचे काम केले आहे. चार महिन्यांपासून शाळेत हजर नसलेल्या आपल्या शिक्षक पत्नीच्या मस्टरवरही स्वत:च सह्या केल्याचेही निदर्शनास आले आहे. करवीर तालुक्यातील कोथळी येथील विद्यामंदिर शाळेत घडलेला हा प्रकार शाळा व्यवस्थापन समितीने उघडकीस आणला आहे. समितीने यासंदर्भात सीईओ  डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. भरत कमते व नामदेव कांबळे यांनी जि.प. सीईओंकडे तक्रार दिली आहे. 

तक्रारीत म्हटल्यानुसार, कोथळी विद्यामंदिरमध्ये नवनाथ व्हरकट हे अध्यापक, तर सुवार्ता नवनाथ व्हरकट या अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीच्या मनीषा आमते व वैशाली कांबळे या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यावयास गेल्या असता, हे दोघे शिक्षक बर्‍याच वेळा हजर नसल्याचे निदर्शनास आले.  मस्टर तपासले असता नवनाथ व्हरकट सुट्ट्या वगळता 181 दिवसांपूर्वी 70 दिवसच शाळेत हजर आहेत, त्यातही 35 दिवस कॉम्प्युटरवरचे काम असल्याचे नमूद केले आहे. अध्यापिका सुवार्ता व्हरकट यांच्याबाबतीत विचारणा केली असता, मुख्याध्यापक पवार यांनी, व्हरकट या प्रतिनियुक्तीवर कळंबा येथील शाळेत आहेत.

त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या मस्टरवर त्यांचे पती नवनाथ व्हरकट हेच सही करतात, असे सांगितले. याचा जाब विचारला असता, अशी पद्धत पूर्वीपासून चालत असल्याचे उत्तर त्यांनी समिती सदस्यांना दिले. यासंदर्भात खुलासा मागितल्यानंतर सुवार्ता व्हरकट यांनी स्वत: शाळेत येऊन राहिलेल्या 9 दिवसांच्या सह्या मारण्याचे काम केले आहे. हा प्रकार उघडकीस आणण्याचे धाडस करणार्‍या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवरच याच्याशी संबंधित घटकांकडून दबाब आणून अरेरावी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. उडवाउडवीची उत्तरे देऊन शिक्षक दाम्पत्याची पाठराखणही केली गेली आहे. तरीही न घाबरता समितीने थेट सीईओंकडे धाव घेतली आहे.