Thu, May 23, 2019 20:54
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ग्रा.पं. संगणक कर्मचारी संघटनेचा जि.प.वर मोर्चा

ग्रा.पं. संगणक कर्मचारी संघटनेचा जि.प.वर मोर्चा

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:45AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या थकीत मानधनाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटनेने सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चाद्वारे धडक दिली. डिसेंबर 2016 ते जानेवारी 2018 पर्यंत मानधन मिळाले नसल्याचा आरोप यावेळी दिलेल्या निवेदनात केला आहे. टाऊन हॉल बागेपासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर गेला. तेथे कर्मचार्‍यांनी रस्ता अडवून फाटकावरच ठाण मांडले. सुमारे दोन तास निदर्शने केल्यानंतर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की कर्मचार्‍यांच्या थकीत मानधनासाठी यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत.

शासन निर्णयानुसार आर.टी.जी.एस. केल्यानंतर केंद्र चालकाच्या खात्यावर मानधन जमा होणार होेते, पण गेल्या वर्षभरात खात्यावर रक्‍कम जमा झाली नाही. मानधन नसतानाही ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सतत कर्मचार्‍यांवर दबाव आणला जात आहे. तालुका आणि जिल्हा परिषदेकडे बैठकीला जाण्यासाठीचा प्रवास खर्चही दिला जात नाही. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश  कांबळे, उपाध्यक्ष पांडुरंग सावंत, सचिव प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.