Tue, Jul 23, 2019 16:43होमपेज › Kolhapur › जिल्हा बँकेचे आयपीडीआय बाँड विक्रीचे 50 कोटींचे लक्ष्य

जिल्हा बँकेचे आयपीडीआय बाँड विक्रीचे 50 कोटींचे लक्ष्य

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आयपीडीआय बाँड विक्रीसाठी रिझर्व्ह बँकेने देशभरातून एकमेव निवड केलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने उद्घाटनानंतर दहा दिवसांतच दमदार पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 191 शाखांमधून विक्री सुरू असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढता प्रतिसाद पाहता मार्चअखेरपर्यंत 50 कोटींचे लक्ष्य सहज साध्य होईल, असा विश्‍वास बँकेने व्यक्‍त केला आहे. अडीच कोटी रुपयांची उद्घाटनालाच सलामी झाली होती. आता ‘कोजिमाशी’ने 10 कोटी गुंतवले असून आणखी 10 कोटी देण्याचे मान्य केले आहे. शुक्रवारी जिल्हा बँकेत चेअरमन आ. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ‘कोजिमाशी’च्या पदाधिकार्‍यांनी बाँड गुंतवणुकीचे पत्र दिले.

11 फेब्रुवारीला या बाँड विक्रीचा प्रारंभ झाला होता. व्यक्‍तिगत 10 हजार तर संस्थेसाठी 50 हजार व त्या पटीत बाँड, 9 टक्के फिक्स व्याज दर, 10 वर्षे मुदत, 10 वर्षांनंतर रक्‍कम हवी असल्यास नवव्या वर्षी त्याप्रमाणे मागणी करणे आवश्यक आहे. दर वर्षाला व्याज देणारी व गुंतवणूकदार सांगतील त्या बँकेत त्यांच्या खात्यावर ही व्याज रक्‍कम जमा होणारी अशी या बाँड विक्री योजनेची वैशिष्ट्ये आहेत. जिल्हा बँकेच्या व्यवसाय वाढून नफा वृद्धी होण्याच्या द‍ृष्टीने स्वत: चेअरमन आमदार हसन मुश्रीफ यांनी यात पुढाकार घेतला आहे. संचालकांमार्फत ते स्वत: मोठ्या संस्थांशी बोलून गुंतवणूक करण्याचा आग्रह धरत आहेत.

‘कोजिमाशी’चे दादासाहेब लाड यांच्याशी चर्चा करून त्यांनाही आग्रह धरला होता. त्यानुसार लाड यांनी 10 कोटी रुपये गुंतवल्याचे पत्र दिले आहे. शिवाय पुढील महिन्यात आणखी 10 कोटी गुंतवू, असाही शब्द दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक माजी आ. पी. एन. पाटील, माजी खा. निवेदिता माने, प्रा. संजय मंडलिक, पी.जी.शिंदे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यासह प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने उपस्थित होते.